भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 08:58 IST2025-10-23T08:56:14+5:302025-10-23T08:58:30+5:30
सगळीकडेच दिवाळीचा जल्लोष सुरू असताना, भाऊबीजेच्या दिवशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

AI Generated Image
सगळीकडेच दिवाळीचा जल्लोष सुरू असताना, भाऊबीजेच्या दिवशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या पवित्र सणाच्या दिवशीच उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. माहेरी जाण्यावरून झालेल्या किरकोळ कौटुंबिक वादातून एका संतापलेल्या पत्नीने आपल्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलासह विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, गावावर शोककळा पसरली आहे.
काय आहे नेमकी घटना?
जिल्ह्याच्या बंडा पोलीस ठाणे हद्दीतील नारायणपूर गंगा गावात ही दुर्दैवी घटना घडली. पंकज कुमार हे त्यांची पत्नी आरती आणि ९ वर्षांचा मुलगा प्रतीक यांच्यासह आनंदात जीवन जगत होते. त्यांच्यासोबत पंकज यांची १० वर्षांची भाची सुष्मिताही राहत होती. परंतु, भाऊबीजच्या निमित्ताने आरती यांनी माहेरी जाण्याचा आग्रह धरला. पतीने नकार दिल्यावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
दरम्यान, पंकज यांचा मुलगा प्रतीक आणि भाची सुष्मिता यांच्यातही कशावरून तरी भांडण झाले. या क्षुल्लक गोष्टीचा मुद्दा बनवून पत्नी आरतीने माहेरी जाण्याचा हट्ट आणखी तीव्र केला. मात्र, पतीने स्पष्टपणे नकार दिल्यावर, आरती यांचा संताप अनावर झाला.
उचलले धक्कादायक पाऊल!
पतीच्या नकाराने संतापलेल्या आरती यांनी अत्यंत धक्कादायक पाऊल उचलले. त्यांनी घरात ठेवलेला सल्फास नावाचा विषारी पदार्थ आधी आपल्या ९ वर्षांच्या प्रतीक या मुलाला खाऊ घातला आणि त्यानंतर स्वतःही सल्फास खाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच पंकज कुमार यांनी तातडीने पत्नी आणि मुलाला घेऊन स्थानिक सीएचसी रुग्णालयात धाव घेतली, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर माय-लेकाला मृत घोषित केले.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक ग्रामीण दीक्षा अरुण भामरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माय-लेकाचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा मुख्यालयात पाठवले आहेत. अपर पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
गावावर पसरली शोककळा
माहेरी जाण्याच्या एका वादातून आईने आपल्या चिमुकल्या मुलासह घेतलेल्या या आत्मघाती निर्णयामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भाऊबीज सारख्या सणापूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे नातेवाईक आणि गावात शोककळा पसरली आहे.