इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:29 IST2025-05-05T17:26:43+5:302025-05-05T17:29:29+5:30

Pune Murder Case : एका इन्स्टाग्राम मेसेजवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला पोहोचला की, तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

A fight broke out over an Instagram message a neighbor in Pune killed a young man by hitting him with a stone! | इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 

इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात इन्स्टाग्रामच्या मेसेजवरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने तरुणाला जीवे मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका इन्स्टाग्राम मेसेजवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला पोहोचला की, तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या मेसेजमध्ये पीडित व्यक्तीच्या बहिणीचा फोटो होता. यावरून पीडित व्यक्तीने शेजाऱ्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातून वाद वाढत गेला आणि शेजाऱ्याने तरुणाला दगडावर आपटून, गळा दाबून त्याचा जीव घेतला.

पुण्यापासून १३० किमी अंतरावर असलेल्या इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात शनिवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास ही क्रूर घटना घडली. मृत तरुणाचे नाव आकाश चौघुले असून, त्याचे वय २५ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत तरुण आकाश हा अंथुर्णे गावचा रहिवासी होता. याच गावात त्याच्या कुटुंबाचा स्टेशनरीचा छोटासा व्यवसाय आहे. सदर घटनेनंतर मृत तरुणाची आई शांताबाई चौघुले यांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. शांताबाई यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला. रविवारी सकाळी पोलिसांनी आरोपी राजेश पवार उर्फ तात्या या २१ वर्षीय तरुणाला अटक केली. राजेश हा आकाशच्याच गावात राहत असून, मजुरीची कामे करतो. ७ मेपर्यंत राजेशला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रश्न विचारताच सुरू झाले वाद!
एफआयआरनुसार, आरोपी राजेशने आकाशला इन्स्टाग्रामवर एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये आकाशच्या बहिणीचा फोटो होता. राजेशने आपल्या बहिणीचा फोटो का काढला, याचा जाब विचारण्यासाठी आकाश आपल्या आई शांताबाई यांच्यासोबत आरोपीच्या घरी गेला. यावेळी आकाशने राजेशकडे त्या मेसेजबद्दल विचरण केली. मात्र, यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या वादादरम्यान, राजेशने आकाशला ओढत घराबाहेर आणले आणि समोर असलेल्या एका दगडावर आपटले. आरोपीने आकाशचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला. दगडावर डोकं आपटल्यामुळे आकाशच्या डोक्यातून खूप रक्तस्राव होऊ लागला. पुढच्या काही क्षणातच त्याच्या शरीराची हालचाल थांबली, अशी माहिती त्याची आई शांताबाई यांनी पोलिसांना दिली. 

आईने मदतीसाठी फोडला टाहो
आपल्या मुलाला निपचित पडलेले पाहताच शांताबाई यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. काही शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आकाशला स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शनिवारी संध्याकाळी उशीरा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. शवविच्छेदन अहवाल आणि चौकशीनंतर रविवारी पहाटे आरोपी राजेश पवार याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: A fight broke out over an Instagram message a neighbor in Pune killed a young man by hitting him with a stone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.