५०० शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण देणार!
५०० शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण देणार!
()
दि स्काऊटस्-गाईड ऑर्गनायझेशनचे नागपुरात कार्यालय : राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा
नागपूर : दि स्काऊटस्-गाईड ऑर्गनायझेशन या संस्थेने अलीकडेच उपराजधानीत आपले कार्यालय सुरू केले असून, ही संस्था लवकरच नागपूर जिल्ह्यातील ५०० शाळांमधील एक लाख विद्यार्थ्यांना स्काऊटस्-गाईडचे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय आयुक्त राज के. पी. सिन्हा यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, हा केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाचा उपक्रम असून, तो शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. यासाठी दि स्काऊटस्-गाईड ऑर्गनायझेशन या संस्थेची अधिकृत निवड झाली आहे. त्यानुसार संस्थेने नुकताच महाराष्ट्रात प्रवेश करून नागपुरात पाच राज्यांचे क्षेत्रीय कार्यालय सुरू केले आहे. त्यानुसार या कार्यालयाच्या माध्यमातून कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश व गुजरात येथील कामांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. हा एकूण चार वर्षांचा कार्यक्रम राहणार आहे. यात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तीन टप्प्यात हे प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन ती उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले जाईल; सोबतच वर्षातून एकदा काही निवडक विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींशी भेटण्याची संधी उपलब्ध केल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, सध्या देशात विद्यार्थ्यांना स्काऊटस्-गाईडचे प्रशिक्षण देण्यासाठी भारत स्काऊट गाईड, ऑल इंडिया बॉय स्काऊट, हिंदुस्तान स्काऊट गाईड व दि स्काऊट-गाईड ऑर्गनायझेशन अशा एकूण चार संस्था कार्यरत आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात ऑल इंडिया बॉय स्काऊट व हिंदुस्तान स्काऊट गाईड या दोन संस्था यापूर्वीपासून काम करीत आहे. यात आता दि स्काऊट-गाईड ऑर्गनायझेशन या संस्थेनेसुद्घा प्रवेश केला आहे. सिन्हा यांच्या मते, त्यांच्या संस्थेने शासकीय शाळा, महाविद्यालय वा खासगी अनुदानित शाळा यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे, यासंबंधी राज्य शासनाकडून परवानगी प्राप्त करायची आहे. ती परवानगी अजूनपर्यंत संस्थेला मिळाली नसून, लवकरच ती प्राप्त होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या परवानगीनंतर संस्थेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
....
Web Title: Scout-guide training in 500 schools
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.