अनैतिक संबंधाच्या रागातून दरवाजा तोडून तरुणाचे अपहरण; गंभीर मारहाणीने शरीरावर ७० टाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:54 IST2025-11-19T17:54:00+5:302025-11-19T17:54:59+5:30
चित्रपटात शोभेल असा हल्ल्याचा थरार; कारचालक हातात लोखंडी रॉड घेऊन हल्ला करण्यासाठी पुढे येताच त्याने जीव वाचवत पळ काढला. त्यावेळी त्याने ११२ वर फोन करून माहिती दिली होती.

अनैतिक संबंधाच्या रागातून दरवाजा तोडून तरुणाचे अपहरण; गंभीर मारहाणीने शरीरावर ७० टाके
वाळूज महानगर : वडगाव (को.) येथे सोमवारी (दि. १७) रात्री १०:३० च्या सुमारास सहा जणांच्या टोळीने घरात घुसून ३० वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची थरारक घटना घडली. हल्ल्यात तरुणास तब्बल ७० टाके पडले असून त्याच्यावर वाळूजमधील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
जखमीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश जाधव हा काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घराशेजारी भाड्याने राहत होता. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा तरुण मोटारसायकलवरून जात असताना चोरडिया फार्महाऊसजवळ मागून आलेल्या कारने त्याला सलग दोनदा जोरदार धडक दिली. कारचालक हातात लोखंडी रॉड घेऊन हल्ला करण्यासाठी पुढे येताच त्याने जीव वाचवत पळ काढला. त्यावेळी त्याने ११२ वर फोन करून माहिती दिली होती. १७ नोव्हेंबरच्या रात्री योगेश जाधव हा प्रथम एका साथीदारासह त्याच्या घरासमोर आला.
तरुणाच्या पत्नीला आवाज देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले, पत्नीने त्यास सांगितले की, तू येथून निघून जा, विनाकारण वाद घालू नको, परंतु तो जोरजोरात दरवाजा वाजवत होता. दरवाजा न उघडल्याने तो परत फिरला आणि काही वेळात चार अनोळखींना घेऊन परत आला. सहा जणांनी मिळून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तरुणास लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याला जबरदस्ती कारमध्ये बसवून कांचनवाडीच्या दिशेने नेण्यात आले. मात्र कार काही अंतरावर बंद पडल्याने तरुणाने संधी साधून पळ काढला आणि जवळची पोलिस चौकी गाठली. पोलिसांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला वाळूज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या डोक्यास ७० टाके पडल्याचे फिर्यादीत म्हटले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
चित्रपटात शोभेल असा हल्ल्याचा थरार
१० नोव्हेंबर रोजी चोरडिया फार्महाऊसजवळ कार अचानक वेगाने येते आणि तरुणाला सलग दोनदा उडवते. हातात लोखंडी रॉड घेऊन बाहेर पडणारा हल्लेखोर व तरुणाने तेथून काढलेला पळ. पण ही फक्त सुरुवात होती. १७ नोव्हेंबरच्या रात्री सहा जण थेट घराचा दरवाजा फोडून आत शिरतात आणि लोखंडी रॉडने निर्दयीपणे मारहाण करून त्याला जबरदस्ती कारमध्ये ढकलून अपहरण करतात. टोळीने लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत तरुणाच्या डोक्यास तब्बल ७० टाके घातले असून पाठीवर व हातावर खोल जखमा आहेत.
अनैतिक संबंधातून उफाळलेली हिंसा
काही महिन्यांपासून पेटलेला संशय, अनैतिक संबंधाचा ताप आणि पूर्वीचा वाद यांचा मिलाफ होऊन या हल्ल्याने उग्र रूप धारण केले. या घटनेचा सूत्रधार योगेश जाधव आहे, तर त्याच्यासोबत आणखी पाच अनोळखी इसम होते. सहा जणांची ही टोळी घर फोडून, हल्ला करून आणि अपहरणाचा प्रयत्न करून पसार झाली.
आरोपींचा थरारक पाठलाग, दोन आरोपींसह कार ताब्यात
१७ नोव्हेंबरच्या रात्री १०:३० वाजता झालेल्या लोखंडी रॉडने मारहाण व अपहरणाच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी अत्यंत जलद आणि अचूक कामगिरी करत दोन्ही मुख्य आरोपींना स्वीफ्ट कारसह ताब्यात घेतले. फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करून अपहरण करणारे योगेश नामदेव जाधव (३१, रा. म्हारोळा, ता. पैठण) आणि दिनेश सोबकचंद मेहर (३४, रा. पेंढापूर, ता. गंगापूर) हे आरोपी पकडण्यात आले. या धडक कारवाईत पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोउपनि अर्जुन कदम तसेच गुन्हे शाखेतील पोह. योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, दत्तात्रय गढेकर, पोअं. दादासाहेब झारगड आणि सोमनाथ दुकळे यांनी विशेष कामगिरी बजावली.