जगातील सर्वांत शक्तिशाली LSD ड्रग्जची छत्रपती संभाजीनगरात तस्करी; ‘Gen-Z’ टार्गेटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:22 IST2025-10-04T16:21:22+5:302025-10-04T16:22:19+5:30
काय आहे एलएसडी ड्रग्ज? चार हजारांना पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराएवढ्या कागदाद्वारे नशा; दुबई रिटर्न, अभियांत्रिकीचा विद्यार्थी बनला ड्रग्ज पेडलर

जगातील सर्वांत शक्तिशाली LSD ड्रग्जची छत्रपती संभाजीनगरात तस्करी; ‘Gen-Z’ टार्गेटवर
छत्रपती संभाजीनगर : जगभरात सर्वांत शक्तिशाली ड्रग्जपैकी एक समजल्या जाणाऱ्या एलएसडीचे (लायसरजिक ॲसिड डायएथिलामाइड) तस्कर आता शहरापर्यंत पोहोचले असून, उच्चभ्रू पार्ट्यांसह ‘जनरेशन झेड’ला त्याचा लाखो रुपयांत पुरवठा हाेत आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागने (एएनसी) गुरुवारी रात्री बेगमपुरा परिसरात हे ड्रग्ज विकण्यासाठी आलेला तस्कर खादरी मारुफ अहमद शाहिद अहमद (२६, रा. आरेफ कॉलनी) याला अटक करत त्याच्या ताब्यातून ०.०९ ग्रॅमचे दहा कागदी तुकडे जप्त केले.
एएनसीच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना एलएसडी ड्रग्जबाबत माहिती प्राप्त झाली होती. २ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता बागवडे यांनी पथकासह बीबी-का-मकबरा परिसरात सापळा रचला. त्यात तिकीट घराजवळ मारुफ येताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्या खिशात एलएसडी ड्रग्जच्या दहा कागदांचे तुकडे आढळले. वैज्ञानिक तज्ज्ञ ललिता ठोके यांनी ते ड्रग्जच असल्याचा निष्कर्ष देताच त्याला अटक करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार लालखान पठाण, संदीपान धर्मे, नितेश सुंदर्डे, महेश उगले, विजय त्रिभुवन, सतीश जाधव, छाया लांडगे यांनी ही कारवाई केली.
काय आहे एलएसडी ड्रग्ज?
-एलएसडी म्हणजेच लायसरजिक ॲसिड डायएथिलामाइड रसायन असते. हे जगातील अत्यंत महागड्या, धोकादायक ड्रग्जपैकी एक समजले जाते. त्यामुळे याला भारतात बंदी आहे.
-याच्या सेवनानंतर १५ ते २० मिनिटांत व्यक्ती आभासी जगात जाते. त्याचे वास्तवाचे भान हरपून जाते व स्थळ-काळाचे तारतम्यही राहत नाही.
-साधारण पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराएवढ्या ब्लाॅटर पेपरवर एका बाजूने सध्याच्या तरुणाईला आकर्षक वाटेल अशी डिजाइन असते, तर मागील बाजूने ड्रग्जचा अंश असतो. एका शिटमध्ये जवळपास १००० तिकिटं असतात.
-मिठाच्या क्यूबवर हे तिकीट ठेवून जिभेवर ठेवून याची नशा केली जाते. लाळेद्वारे ते थेट रक्तात मिसळत असल्याने त्याचा मेंदू, मनावर गंभीर व दीर्घकालीन परिणाम होतो.
शहरातील उच्चभ्रू पार्ट्यात सेवन
एका तिकिटाची ३ ते ५ हजारांना विक्री होते. आरोपीच्या माहितीनुसार, शहरातील उच्चभ्रू पार्ट्यांत याचे सेवन केले जाते. प्रामुख्याने उच्चभ्रू वसाहतीतील तरुण- तरुणी त्यांचे मुख्य ग्राहक आहेत.
अभियंता, दुबई रिटर्न, पुण्यात वास्तव्य
सेव्हन हील परिसरातील नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतलेला खादरी मारुफ काही महिने दुबईत वास्तव्यास होता. सध्या काही दिवस पुणे, तर काही दिवस शहरात राहतो.
महानगरांत होत होती विक्री, आता छोटी शहरे टार्गेट
महागडे व शक्तिशाली एलएसडी ड्रग्जचे मेट्रो शहरात सेवन केले जात होते. काही महिन्यांपासून या तस्करांनी छोट्या शहरातील श्रीमंत कुटुंबातील तरुण, तरुणींना लक्ष्य केले.
-शहरात कारवाई झालेली असताना वसईमध्ये २ ऑक्टोबर रोजी वसई पोलिसांनी ४ लाख ४० हजारांचे ०.४४० ग्रॅम एलएसडी जप्त केले.
-ऑगस्ट महिन्यात हैदराबादमध्ये विशेष पथकाने सहा अभियंत्यांच्या पार्टीत छापा टाकत ०.०५ एलएसडी जप्त केले होते.
-जुलै महिन्यात केंद्रीय पथकाने दिल्लीत लाखो रुपयांचे १ हजार १२७ ब्लॉट्स पेपर जप्त केले होते.
-फेब्रुवारीत रशिया, अमेरिकेतून तस्करी होत असलेले २७ ग्रॅम एलएसडी जप्त केले होते.
-मे महिन्यात गोवा पोलिसांनी ११०.७२ ग्रॅम एलएसडी जप्त केले होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ११ कोटीपर्यंत किंमत होती.