आजारी वडिलांना भेटण्याची इच्छा अधुरी; अचानक वळण घेणाऱ्या टेम्पोला धडकून पती-पत्नी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:02 IST2025-11-14T13:00:48+5:302025-11-14T13:02:26+5:30
तीन ठिकाणी हात तुटला, छातीत ट्रकचा लोखंडी भाग घुसल्याने १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, कांचनवाडी परिसरातील हृदयद्रावक घटना

आजारी वडिलांना भेटण्याची इच्छा अधुरी; अचानक वळण घेणाऱ्या टेम्पोला धडकून पती-पत्नी ठार
छत्रपती संभाजीनगर : आजारी वडिलांना भेटण्यासाठी निघालेल्या पती-पत्नी व मुलाचा पुलावरून उलट दिशेने वळण घेणाऱ्या बेजबाबदार टेम्पो चालकाला धडकून भीषण अपघात झाला. यात गजानन सांडूसिंग गुमलाडू (३८) व त्यांची पत्नी राधा (३२) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा १४ वर्षीय मुलगा विशाल गंभीर जखमी झाला. गुरुवारी सकाळी ११ वाजता कांचनवाडी परिसरात सोलापूर-धुळे महामार्गावर हा अपघात झाला.
माळीवाडा परिसरातील वरझडी गावचे रहिवासी असलेले गुमलाडू दाम्पत्य दोन मुले, भाऊ, आई-वडिलांसह राहात होते. गजानन क्रेन चालवत होते. काही दिवसांपासून राधा यांच्या वडिलांची प्रकृती खराब होती. त्यामुळे राधा यांनी वडिलांना भेटायला जाण्याचे ठरवले. सकाळी १० वाजता गजानन, राधा व विशाल तिघे दुचाकीने बदनापूरच्या दिशेने निघाले. कांचनवाडी परिसरातून उड्डाणपुलावरून जात असताना समोरील टेम्पो चालकाने बेजबाबदारपणे अचानक टेम्पो थांबवून उलट दिशेला असलेल्या रोडवर वळण घेतले. यात गजानन यांची दुचाकी थेट टेम्पोला धडकली. यात तिघेही टेम्पोवर जाऊन आदळले. ही धडक इतकी भीषण हाेती की, दुचाकी टेम्पोवर आदळून गजानन, राधा जागीच मृत्युमुखी पडले.
तीन ठिकाणी हात तुटला, छातीला गंभीर इजा
गजानन, राधा यांचा मृत्यू झालेला असताना त्यांचा मुलगा विशालचा उजवा हात व पाय जवळपास तीन ते चार ठिकाणी तुटला. छातीत गंभीर इजा होऊन मृत वडिलांजवळच तो बेशुद्ध पडला. स्थानिकांनी धाव घेत रुग्णवाहिकेद्वारे तिघांना घाटीत हलवले. विशालवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
...दोन तासांत होत्याचे नव्हते झाले
बदनापूरला जाताना लहान मुलाला सोबत घेत गजानन, राधा यांनी मोठ्या मुलाला रात्री लवकर घरी परत येऊ, असे सांगितले होते. मात्र, दोन तासांत होत्याचे नव्हते झाले. घाटी रुग्णालयात शवविच्छेदनगृहाबाहेर गजानन यांच्या मोठ्या मुलाचा आई-वडिलांच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. नातेवाईकांच्या गराड्यातही तो शांत बसला होता. गजानन यांच्या लहान भावाला मात्र रडू आवरत नव्हते.
महिन्याभरात दुसरे जोडपे गमावले
वरझडी गावातील जारवाल नावाच्या दाम्पत्याचा नुकताच लासूर स्टेशन परिसरात अपघाती मृत्यू झाला होता. महिन्याभरातच पुन्हा गावातील दाम्पत्याचा अशाचप्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थ हळहळले. सातारा पोलिसांनी बेजबाबदार चालक अनिल संजय राठोड याला अटक केली. त्याच्या वडिलांच्या नावे टेम्पो असून, औद्योगिक वसाहतीत माल पुरवण्यासाठी तो जात होता. उपनिरीक्षक रामकृष्ण काळे पुढील तपास करत आहेत.