'शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत देणार'; मंत्री सावेंच्या आश्वासनानंतर मंगेश साबळेंचे उपोषण मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:11 IST2025-10-06T19:10:54+5:302025-10-06T19:11:20+5:30
ओला दुष्काळ जाहीर करा! मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून सुरू होते उपोषण

'शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत देणार'; मंत्री सावेंच्या आश्वासनानंतर मंगेश साबळेंचे उपोषण मागे
सिल्लोड: अतिवृष्टी व ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, या प्रमुख मागण्यांसाठी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर आज दुपारी ३.३० वाजता सरपंच मंगेश साबळे यांनी सोडले. मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सुरू मागील आठ दिवसांपासून साबळे यांनी उपोषण सुरू होते. दरम्यान, मंत्री सावे यांनी आज उपोषणस्थळी साबळे यांची भेट घेतली. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत आहेत. येत्या आठ दिवसात शासन शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार आहे. तुमच्या मागण्या शासनाला पाठवून आठ दिवसात प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मंत्री सावे यांनी शासनातर्फे दिल्याने मंगेश साबळे यांना दिले. शासनातर्फे देण्यात आलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेत असल्याचे साबळे यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास क्षीरसाठ, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश पाटील बनकर,जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इंद्रिस मुलतानी, भाजपचे जिल्हा सचिव कमलेश कटारीया, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील मिरकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, भाजपाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, मनोज मोरेल्लू , विष्णू काटकर सहित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सैयद अनिस, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे सहित विविध पक्षाचे पदाधिकारी हजर होते.
राष्ट्रवादीचे शिंदे, रोहित पवारांची भेट
दरम्यान, उपोषणस्थळी सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी भेट देत मंगेश साबळे यांची विचारपूस केली. हा लढा तुमचा एकट्याचा नसून सर्व शेतकरी बांधवांचा आहे. शरद पवारांनी १२ ऑक्टोबरपर्यंत शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील. तुम्ही जीव धोक्यात घालू नका असे सांगितले. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आहे. निवडणुकीपूर्वी हेक्टरी २६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आल्यानंतर फक्त १३ हजार रुपये दिले गेले. हे भूलथापा देणारे सरकार आहे असे, अशी टीका देखील त्यांनी केली.