आभाळ कोसळलं तरी ई-पीक पाहणी का नाही? अंतिम तारीख उलटली; तलाठ्यांकडे चकरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:15 IST2025-02-12T16:10:35+5:302025-02-12T16:15:02+5:30
नोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती. ही मुदत नुकतीच संपली.

आभाळ कोसळलं तरी ई-पीक पाहणी का नाही? अंतिम तारीख उलटली; तलाठ्यांकडे चकरा
छत्रपती संभाजीनगर : ई-पीक पाहणी करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. मात्र शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पिकांचा ई-पीक पेरा नोंद करण्याबाबत शासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. मुदतवाढही देण्यात आली. मात्र, जिल्ह्याच्या ई-पीक पाहणी पेऱ्याचे प्रमाण केवळ ५६ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले.
अंतिम तारीख उलटली; तलाठ्यांकडे चकरा
नोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती. ही मुदत नुकतीच संपली. यामुळे आता सातबाऱ्यावर पिकाची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे चकरा माराव्या लागतील.
४ वर्षांपासून ई-पीक पाहणी बंधनकारक
चार वर्षांपासून राज्यात ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन आणण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पिकाचे छायाचित्र घेऊन ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करावे लागते. यासोबत पीक पेऱ्याची नोंद करणे बंधनकारक आहे. नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे अनुदान, विमा मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
कोणत्या तालुक्यात किती ई-पीक पाहणी ? (तक्ता)
तालुका ----टक्केवारी
कन्नड - ५१.३९
खुलताबाद-- ५४.२१
गंगापूर--- - ५५.६३
छत्रपती संभाजीनगर - ४५.६४
पैठण-- ५६.४४
फुलंब्री--- ५०.३८
वैजापूर--- ६४
सिल्लोड-- ५६.८८
सोयगाव-- ७१.६५
सोयगाव एक नंबर; छत्रपती संभाजीनगर सर्वात मागे
ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात जिल्ह्यात सोयगाव तालुका प्रथम स्थानी आहे. ७१.६५ टक्के पीक पाहणी झाली. छत्रपती संभाजीनगर तालुका सर्वात मागे आहे. केवळ ४५.६४ टक्के शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली.
अनेकांकडे फोनच नाही; इंटरनेटही ‘स्लो’
ॲड्राॅइड मोबाइल असणारे शेतकरी स्वत: ई-पीक पेरा नोंद करू शकतात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे असे मोबाइल नाहीत, त्यांना इतरांच्या मोबाइलवरून नोंद करता येते. परंतु बऱ्याचदा हे ॲप्लिकेशन ‘हँग’ होते. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधांचा अभावही यास कारणीभूत आहे.
४४ टक्के शेतकऱ्यांचे काय होणार?
ई-पीक पाहणी करू न शकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ४४ टक्के असल्याचे महसूल विभागाकडून प्राप्त माहितीवरून दिसते. आता या शेतकऱ्यांचे काय होणार, असा प्रश्न आहे.
ई-पीक पाहणी ही महसूल विभागाच्या वतीने करण्यात येते. शेतकऱ्यांना ॲप्लिकेशनवर ही नोंदणी करावी लागते. नैसर्गिक संकटात पिकाचे नुकसान झाल्यास ही नोंद उपयोगी पडते. अन्यथा अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याचा प्रसंग येऊ शकतो. यामुळे दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पाहणी मुदतीत करावी.
- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक