का बिघडतेय दातांचे आरोग्य ? छत्रपती संभाजीनगरात दोन वर्षांत काढले २७ हजार दात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:15 IST2026-01-14T16:15:25+5:302026-01-14T16:15:56+5:30
दंत रुग्णांमध्ये वाढ, ३० हजार रुग्णांच्या दातात चांदी-सिमेंट

का बिघडतेय दातांचे आरोग्य ? छत्रपती संभाजीनगरात दोन वर्षांत काढले २७ हजार दात
- संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : दात दुखू लागल्यानंतरच रुग्ण दवाखान्याचा उंबरठा ओलांडत असल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील आकडेवारीतून दिसते. गेल्या दोन वर्षांत तब्बल २७ हजार रुग्णांचे दात काढण्याचे उपचार करण्यात आले. त्यात २०२४ मध्ये १२ हजार, तर २०२५ मध्ये १४ हजार रुग्णांचे दात काढण्यात आले.
बदललेला आहार, मुख आरोग्याकडे दुर्लक्ष यासह अनेक कारणांनी दातांचे आरोग्य बिघडत आहे. दातकिडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत साध्या भरण्याने किंवा रूट कॅनॉलने दात वाचवता येतो. मात्र, वेदना असह्य झाल्यावरच उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमुळे दात काढणे हा शेवटचा पर्याय उरतो. दंत स्वच्छतेकडे दुर्लक्ष, गोड व चिकट पदार्थांचे वाढते सेवन, तसेच तंबाखूजन्य सवयींमुळे दात वाचविण्याऐवजी गमावण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
दातांची काळजी...
- दिवसातून किमान दोन वेळा दात स्वच्छ घासावेत.
- गोड पदार्थ व शीतपेयांचे सेवन मर्यादित ठेवावे.
- सहा महिन्यांतून एकदा दंत तपासणी करावी.
- तंबाखू व गुटख्यापासून दूर राहावे.
- लहान मुलांमध्ये दात घासण्याची सवय लहानपणापासून लावावी.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील स्थिती...
दंतोपचाराचा तपशील -
रुग्णसंख्या २०२४- रुग्णसंख्या २०२५
दात काढणे- १२,४०६-१४,९८८
छोट्या शस्त्रक्रिया - ३,८१४-४,६७०
मोठ्या शस्त्रक्रिया - १११-१४८
हिरड्यांवरील शस्त्रक्रिया - ५३३-७९९
चांदी भरणे- ४,५२४ - ११,३४१
सिमेंट भरणे- १०,९७६ - १३,८०२
रुट कॅनाॅल उपचार - ६,९२३-७,४२२
बालकांची दंत तपासणी - १०,३७७-११,५०९
बालकांच्या दातात सिमेंट - १,९७०-२,१५४
बालकांच्या रुट कॅनाॅल उपचार - १,७२४- १,७७०
बालकांचे दात काढणे - १,६५३-२,१७७
दंतव्यंगाेपचार - ७,०९०-७,७३४
संपूर्ण कवळी - ५२७-९३२
समस्या उद्भवू शकतात
काळजी घ्यावी. मौखिक आरोग्य न राखल्यास समस्या उद्भवतात. जसे की, मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात न येणे, गरोदरपणी हिरड्यांचे आजार असल्यास मुदतपूर्व बाळ जन्माला येणे, बाळामध्ये व्यंग, गर्भपात इ. समस्या उद्भवू शकतात.
- डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
तीव्र वेदनेनंतरच उपचार
खाण्या-पिण्याच्या सवयीत झालेला बदल, दंत आरोग्याकडे दुर्लक्ष, यामुळे दंतरुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
- डाॅ. तेजल पल्लोड, दंतरोगतज्ज्ञ
वेळीच लक्ष द्या
पालकांनी लक्ष द्यावे. कार्बोहायड्रेट्स, शुगर आणि स्टार्च यांचे आहारातील वाढते प्रमाण, पिण्याच्या पाण्यात फ्लोराइडचे कमी प्रमाण, चॉकलेट, केक, वेफर्स, बिस्किट्स यांचे आहारातील वाढलेले प्रमाण यासह इतर कारणांनी लहान मुलांमध्ये दंत व मुखरोग वाढत आहे. याकडे पालकांनी वेळीच लक्ष द्यावे.
- डॉ. नीलेश रोजेकर, बाल दंतरोगतज्ज्ञ