परतीच्या पावसाची भीती कशाला? जुना ट्रेंड पुन्हा, यंदा दिवाळीत 'वॉटरप्रूफ आकाशकंदील'ची धूम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:13 IST2025-10-06T15:12:02+5:302025-10-06T15:13:02+5:30
जुना ट्रेंड परतला! १९९० च्या जिलेटीन पेपरचा पारदर्शक आकाशकंदील नव्या रूपात आला

परतीच्या पावसाची भीती कशाला? जुना ट्रेंड पुन्हा, यंदा दिवाळीत 'वॉटरप्रूफ आकाशकंदील'ची धूम!
छत्रपती संभाजीनगर : यंदा झालेल्या पावसाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. आता पावसा नको, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, हवामान खात्याकडून येणाऱ्या बातम्यांनुसार यातील परतीचा पाऊस येत्या दिवसांत जोर धरणार आहे. या पावसात आकाशकंदील भिजून खराब होऊ नये व दिवाळीच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी बाजारात वॉटरप्रूफ आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
वॉटरप्रूफ आकाशकंदील, तेही ‘मेड इन वाळूज’
चक्रीवादळाचा धोका टळला तरी यंदा परतीचा पाऊसही जोरदार राहिला. या व्यावसायिक संधीचा उपयोग करत वाळूज येथील डायपॅचिंगमध्ये काम करणाऱ्या काही उद्योगांनी पीव्हीसी मटेरियलमधील आकाशकंदील बाजारात आणले आहेत. त्यात २६ प्रकार आहेत. आकाशकंदील ८० ते ३०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत.
राजस्थानचा राजवाडी आकाशकंदील आकर्षण
राजस्थानमधून बांधणी, जरदोजी वर्क असलेले कापडी आकाशकंदील नाविन्यपूर्ण ठरत आहेत. याशिवाय फोटोफ्रेममधील राजवाडी आकाशकंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. कारण, टू इन वन असा वापर या आकाशकंदिलांचा आहे. १ हजार ते २५०० रुपयांदरम्यान हे आकाशकंदील विकले जात आहेत.
देवतांचे छायाचित्र असलेले आकाशकंदील
मागील दोन वर्षांपासून देव-देवतांचे छायाचित्र असलेल्या आकाशकंदिलांनाही मागणी आहे. यातही एमडीएफ मटेरियलचा वापर केला आहे. काही आकाशकंदील थ्रीडी आहेत. राधाकृष्ण, श्रीराम, विठ्ठल रुखमाई, दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे छायाचित्र असलेले आकाशकंदील आहेत.
जिलेटीन पेपरचा जुना ट्रेंड पुन्हा आला
१९९० च्या आधी जिलेटीन पेपरचा वापर करून पारदर्शक असे आकाशकंदील तयार केले जात होते. पण, नंतर फॅन्सी आकाशकंदिलांनी सर्व ट्रेंड बदलून टाकला. आता जुना ट्रेंड पुन्हा आला असून, नवीन रूपात जिलेटीन पेपरचा आकाशकंदील बाजारात आला आहे.
- राहुल गुगळे, व्यापारी