संपूर्ण शहर होणार ‘वाय फाय’
By Admin | Updated: October 8, 2014 01:06 IST2014-10-08T00:51:43+5:302014-10-08T01:06:22+5:30
औरंगाबाद : इंटरनेटच्या युगात सध्या ‘वाय फाय’ झोन अर्थात वायरलेस फिडेलिटीला खूपच महत्त्व आले आहे.

संपूर्ण शहर होणार ‘वाय फाय’
औरंगाबाद : इंटरनेटच्या युगात सध्या ‘वाय फाय’ झोन अर्थात वायरलेस फिडेलिटीला खूपच महत्त्व आले आहे. इंटरनेट कनेक्शन ही आता प्रत्येक माणसाची गरज बनली असताना पूर्ण शहरच जर वाय फाय झोनमध्ये परिवर्तीत झाले तर अनेक गोष्टी सुलभ होणार आहेत. डीएमआयसीमुळे उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण होणारे संपूर्ण शहर ‘वाय फाय’ करण्याचा संकल्प औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी केला आहे.
औरंगाबाद शहर हे देशातील एक स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत आहे. तुम्ही बीबी का मकबरा भागात असाल किंवा चिकलठाण्याच्या उद्यमनगरीत, रेल्वेस्टेशनवर असाल किंवा सिडकोच्या टाऊन सेंटरमध्ये, एखाद्या शैक्षणिक कॅम्पसमध्ये किंवा व्यापार- उद्योगात बिझी असाल. ‘वाय फाय शहरा’मुळे तुमच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीत भरच पडणार आहे. उद्योग, सेवा, शिक्षण, शासकीय, तसेच खाजगी क्षेत्रासह सर्वांनाच याचा फायदा होणार आहे.
‘वाय फाय शहरा’त तुम्ही तुमचे स्मार्टफोन, लॅपटॉप, नेटबुक, टॅब्लेटस् आणि इतर मोबाईल डिव्हायसेस इंटरनेटशी सहजतेने कनेक्ट करू शकणार आहात. आपले शहर जगाच्या बरोबरीने चालावे, हे शहर आधुनिक बनावे याचा ध्यास घेतलेल्या राजेंद्र दर्डा यांनी ‘वाय फाय औरंगाबाद’ हा संकल्प जाहीर केला आहे.
‘वाय फाय औरंगाबाद’ जगाशी वेगवान पद्धतीने जोडले जाणार असल्याने त्याचा फायदा स्मार्टफोनधारकांंना, लॅपटॉप, नेटबुक, टॅब्लेटस् युजर्सना होणार आहे. शहराच्या दृष्टीने विचार केल्यास विविध प्रकारच्या सेवा उत्पादकतेमध्ये भर पडणार आहे. नागरी सेवा वेगाने पुरविण्यास मदत, शहराच्या नियोजन आणि योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग या दृष्टीने फायदे होणार आहेत. नागरिकांच्या दृष्टीने विचार केल्यास शहरामधील विविध सेवांशी आणि इंटरनेटशी त्यांना तात्काळ आणि वेगाने जुळता येणार आहे. वाहतूक सुरळीत होणे किंवा करणे, पार्किंगची समस्या, शिवाय टुरिझमच्या क्षेत्रात पर्यटकांना पर्यटनस्थळासंबंधीची माहिती मिळणे, अशा प्रकारचे विविध फायदे मिळणार आहेत.
जगाच्या बरोबरीने चालावे म्हणून
आज इंटरनेट हे मनुष्याच्या जगण्यातील एक महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यामुळेच जगात अनेक शहरे आणि आपल्या देशात काही शहरे ‘वाय फाय’ झाली आहेत. माझे शहरही जगाच्या बरोबरीने चालावे, असे मला वाटते. या शहरातील नागरिकाला आधुनिकतेचे सर्व फायदे मिळायला हवेत, असे मला वाटते. त्या दृष्टीनेच मी ‘वाय फाय शहर’ करण्याचा संकल्प केला आहे.
-राजेंद्र दर्डा