छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कुणाला, ते नंतर ठरेल; पण भाजप मतदारांना गाठतंय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 19:40 IST2024-02-05T19:40:19+5:302024-02-05T19:40:29+5:30
लगबग निवडणुकीची : लोकसभा मतदारसंघाची बांधणीसाठी भाजपाचे ‘गाव चलो अभियान’

छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कुणाला, ते नंतर ठरेल; पण भाजप मतदारांना गाठतंय
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचे राजकीय पडघम वाजू लागले आहेत. आघाड्या, युतीचे गणितं जुळविणे सध्या सुरू आहे. अद्याप कुणाचेही जागा वाटपाचे सूत्र मात्र ठरलेले नाही. त्यावर निर्णय आगामी काळात निर्णय होईल. परंतु भाजपाने मतदारांना गाठून पंतप्रधानांच्या काळातील योजनांचा प्रचार 'गाव चलो अभियाना' तून सुरू केला आहे.
रविवारी शहरातील तिन्ही मतदारसंघ भाजपाने पिंजून काढत मतदारांना केंद्र शासनाने राबविलेल्या योजनांची पत्रके वाटली. काही मतदारांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीमध्ये भाजपा लढविणार की शिंदे गट हे अद्याप ठरलेले नाही. ४ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान 'गाव चलो अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह गृहनिर्माणमंत्री अतुल सावे व प्रदेश पदाधिकारी त्यांना नेमून दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मकरीत्या भाजपा कार्य करीत आहे.
मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या १० वर्षांतील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ सुरू केले आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे काय, हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी मागच्या १० वर्षांतील केंद्र सरकारच्या योजनांची पत्रके वितरित केले जात आहेत. शहरी भागात वॉर्डनिहाय हे अभियान आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, जय भवानीनगर येथून या अभियानाची रविवारी सुरुवात झाली. यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड, गृहनिर्माणमंत्री सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, सरचिटणीस हर्षवर्धन कराड, जालिंदर शेंडगे, मनीषा मुंडे यांच्यासह मंडळ स्तरावरचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी सहभागी झाले होते.
असे लावले आहे कामाला
प्रत्येक युनिटमध्ये भाजप प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बूथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे करणार आहे. जवळपास ८९० बूथवरील मतदारांना संपर्क त्यांना करावा लागणार आहे. लोकसभा मतदारसंघात साधारणत: ३ लाख ५० हजार घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे.