राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:00 IST2025-11-05T12:59:19+5:302025-11-05T13:00:43+5:30
Rahul Gandhi Press Conference Live: 'देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त देशातील जनतेशी खोटे बोलले!'

राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
Rahul Gandhi Press Conference Live: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी(5 नोव्हेंबर 2025) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी पुन्हा एकदा “मत चोरी”चा मुद्दा उपस्थित केला.
राहुल गांधींचा “Hydrogen bomb”
राहुल गांधींनी दावा की, विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी झाली आहे. ते म्हणाले, हे फक्त एका विधानसभा क्षेत्राचे प्रकरण नाही. अनेक राज्यांमध्ये मतांची चोरी सुरू आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, हरियाणाच्या निवडणुकीत प्रथमच पोस्टल बॅलेट आणि वास्तविक मतांचे स्वरूप पूर्णपणे वेगळे दिसले. पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेसला 76 आणि भाजपला फक्त 17 जागा मिळाल्या असत्या. पण अंतिम निकालात काँग्रेस पराभूत झाली.
एका तरुणीने 22 ठिकाणी मतदान केले
एग्झिट पोल आणि पोस्टल बॅलेट दोन्ही काँग्रेसच्या बाजूने होते, पण निकालात 22,779 मतांनी पराभव झाला, आमच्याकडे याचे पुरावे आहेत. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एका तरुणीचा फोटो दाखवत दावा केला की, या तरुणीने कुठे ‘सीमा’, कुठे ‘सरस्वती’ तर कुठे आणखी काही...अशा नावांनी 22 ठिकाणी मतदान केले. यावेळी त्यांनी आणखी एका तरुणीचा फोटो दाखवत प्रश्न उपस्थित केला की, ही ब्राझिलियन महिला हरियाणाच्या मतदार यादीत कशी आली?
LIVE: #VoteChori Press Conference - The H Files https://t.co/IXFaH9fEfr
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 5, 2025
हरियाणात 25 लाख बनावट मते
राहुल गांधींनी दावा केला की, हरियाणामध्ये पाच श्रेणींमध्ये एकूण 25 लाख बनावट मते पडली, म्हणजेच दर आठपैकी एक मतदार खोटा होता. त्यांनी आकडेवारी देताना सांगितले की, 5,21,000 पेक्षा जास्त डुप्लिकेट मतदार आढळले. अशाप्रकारे राज्यात एकूण 2 कोटी मतदारांमध्ये 25 लाख मतांची चोरी झाली आहे.
एका महिला मतदाराचे 223 वेळा नाव
त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, एका बूथवर एकाच महिलेला 223 वेळा मतदार यादीत दाखवले गेले आहे. त्या महिलेने खरोखर किती वेळा मतदान केले? निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यायला हवे. सीसीटीव्ही फुटेज जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आले, जेणेकरून सत्य समोर येऊ नये. ही संपूर्ण मत चोरी भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आली. 1,24,177 मतदारांचे बनावट फोटो वापरल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मुख्य निवडणूक आयुक्त खोटे बोलले
राहुल गांधी म्हणाले की, दलचंद हे उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे मतदार आहेत. त्यांचा मुलगाही हरियाणात मतदार आहे आणि उत्तर प्रदेशात भाजपला मतदान करतो. भाजपशी संबंधित हजारो लोक आहेत. मथुरा सरपंच प्रल्हाद यांचे नावही हरियाणात अनेक ठिकाणी मतदार यादीत आहे. राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही हल्ला चढवला आणि म्हटले की, ज्यांच्याकडे घरे नाहीत त्यांच्या घरांचे क्रमांक शून्य म्हणून नोंदवले जातात, असा त्यांचा दावा होता. राहुल यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला, ज्यामध्ये बेघर लोकांच्या मतदार यादीत असलेल्या पत्त्यांबद्दल माहिती दिली जात होती. राहुल गांधी म्हणाले की, आम्ही उलटतपासणी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशातील जनतेला उघडपणे खोटे बोलले.
हरियाणात जे घडले, तेच बिहारमध्येही घडेल
राहुल गांधींनी आरोप केला की, हरियाणात जे घडले ते बिहारमध्येही घडेल. बिहारमधील मतदार यादीत घोटाळा झाला आहे. मतदार यादी आम्हाला शेवटच्या क्षणी देण्यात आली. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींनी बिहारमधील अनेक मतदारांना मंचावर आमंत्रित केले आणि दावा केला की, त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यांनी असेही सांगितले की, संपूर्ण कुटुंबांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.