शेतकरी आत्महत्येचे सत्र कधी थांबणार? मराठवाड्यात गेल्या वर्षात ९४८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:00 IST2025-01-10T17:31:39+5:302025-01-10T18:00:32+5:30

९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले.

When will the farmer suicide season stop? 948 farmers committed suicide in Marathwada last year | शेतकरी आत्महत्येचे सत्र कधी थांबणार? मराठवाड्यात गेल्या वर्षात ९४८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

शेतकरी आत्महत्येचे सत्र कधी थांबणार? मराठवाड्यात गेल्या वर्षात ९४८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर : गेले वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संपले. राजकीय पक्ष प्रचारात, तर प्रशासन आचारसंहिता अंमलबजावणीत गुंतलेले होते. परिणामी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष झाले. कापूस, सोयाबीनला कमी भावाच्या भोवती विधानसभा निवडणुकीचा प्रचार फिरला; परंतु शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी उपाय शोधण्याबाबत कुठल्याही पक्षाने जाहीर प्रचारातून एक शब्दही काढला नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत मराठवाड्यात ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक २०५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. ९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबीयांना मदतीसाठी पात्र ठरविले असून ६० प्रस्ताव अपात्र ठरविले. उर्वरित ३०३ प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मदतीसाठी पात्र ठरविलेल्या कुटुंबीयांना ३ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये मदतीचे वाटपही झाल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

दिवसाकाठी ३ आत्महत्या
गेल्या वर्षात दिवसाकाठी २ ते ३ शेतकरी आत्महत्या झाल्याचे दिसते. कापूस, सोयाबीनला भाव नसणे, दुधाचे दर मागे-पुढे होणे, शेतीमध्ये शाश्वतता नसणे, यासारख्या अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढला. मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने निसर्गावरच अवलंबून आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही. त्यामुळे बिघडलेले आर्थिक गणिते, अशा चक्रात शेतकरी आहे. या व इतर अनेक कारणांमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या
महिना..................आत्महत्या

जानेवारी ६९
फेब्रुवारी ७०
मार्च ६७
एप्रिल ५८
मे ६२
जून ९४
जुलै ७७
ऑगस्ट १००
सप्टेंबर ८३
ऑक्टोबर ७२
नोव्हेंबर ७२
डिसेंबर १०९
एकूण ९४८

Web Title: When will the farmer suicide season stop? 948 farmers committed suicide in Marathwada last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.