नोकरी मागायला गेला अन् भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगसह एअरगन विसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:29 IST2026-02-16T19:29:04+5:302026-02-16T19:29:33+5:30

आ. संजय केणेकर यांच्या कार्यालयात शस्त्र सापडल्याने गोंधळ; सायंकाळी साताऱ्यातून तरुण ताब्यात, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Went to seek job and forgot airgun along with bag in BJP MLA Sanjay Kenekar's office | नोकरी मागायला गेला अन् भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगसह एअरगन विसरला

नोकरी मागायला गेला अन् भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगसह एअरगन विसरला

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत कंत्राटी नोकरीसाठी आ. संजय केणेकर यांच्या कार्यालयात शिफारसपत्र मागायला गेेलेला तरुण बॅगसह त्यातील एअरगनही तेथेच विसरला. शनिवारी नेहमीप्रमाणे केणेकर यांचे सहकारी कार्यालयात गेल्यानंतर बॅग तपासल्यानंतर पिस्तूल पाहताच एकच हलकल्लोळ उडाला. दुपारी ही पिस्तूल नसून एअरगन असल्याचे समजले. सायंकाळी क्रांतीचौक पोलिसांनी रितेश संतोष होळकर (२३, रा. साईनगर, सातारा) याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

आ. केणेकर यांचे क्रांती चौकात कार्यालय आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांचे सहकारी, सुरक्षारक्षक व कार्यालयात काम करणारे कर्मचारी कार्यालयात पोहोचले. केणेकर यांच्या दालनाबाहेर काळ्या रंगाची एक बॅग पडलेली होती. कर्मचाऱ्याने ती उचलली. तेव्हा त्यात जड वस्तू असल्याने संशय बळावला. त्यांनी बॅग उघडताच त्यात पिस्तूलसदृश शस्त्र निघाले आणि सगळेच घाबरले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह क्रांतीचौक पोलिसांनी धाव घेतली.

वाटले पिस्तूल, निघाली एअरगन
सुरुवातीला केणेकर यांच्या कार्यालयात पिस्तूल निघाल्याच्या चर्चेने सामाजिक, राजकीय क्षेत्रात एकच हलकल्लोळ उडाला. पोलिसांनी पिस्तूल ताब्यात घेतल्यानंतर तपासात ती एअरगन निघाली. भेट दिलेल्या तरुणाचा शाेध सुरू झाला. सायंकाळी ६ वाजता क्रांतीचौक पोलिसांनी रितेशची ओळख स्पष्ट करून त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

हौस महागात पडली
रितेश बी.एस्सी.च्या तृतीय वर्षात आहे. काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. महानगरपालिकेत कंत्राटी नोकरी मिळवण्यासाठी त्याला एकाने केणेकर यांचे शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. तो शुक्रवारी सायंकाळी तेथे गेला. सहा महिन्यांपूर्वी त्याने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून एअरगन हौस म्हणून खरेदी केली होती. क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अंमलदार संतोष मुदिराज अधिक तपास करत आहेत.

...तर कारवाई करावी
सदर तरुण गुन्हेगारी वृत्तीचा असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी. प्रखर हिंदुत्वामुळे माझे विरोधक वाढले आहेत. त्यामुळे काळजी वाटते; पण त्याने केवळ हूडपणातून एअरगन बाळगली असेल तर त्याला त्रास होऊ नये, ही त्याच्या करिअरच्या काळजीपोटी इच्छा आहे.
-संजय केणेकर, आमदार

Web Title : भाजपा विधायक के कार्यालय में नौकरी मांगने गया युवक एयरगन भूला

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में भाजपा विधायक के कार्यालय में नौकरी की सिफारिश मांगने गया एक युवक गलती से एक एयरगन से भरा अपना बैग वहीं भूल गया। पुलिस ने उसे पकड़ लिया और खोज के बाद हंगामा मचने पर आरोप दायर किए।

Web Title : Job Seeker Forgets Airgun at BJP MLA's Office

Web Summary : A young man seeking a job recommendation at a BJP MLA's office in Chhatrapati Sambhajinagar mistakenly left behind his bag containing an airgun. Police apprehended him and filed charges after the discovery caused a stir.