हवामानाच्या अचूक अंदाजासाठी औरंगाबादला ‘डॉप्लर रडार’ बसवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 12:11 PM2021-07-07T12:11:04+5:302021-07-07T12:14:23+5:30

या विभागासाठी हवामान विभागाचे स्वतंत्र केंद्र नसल्यामुळे पावसाचा अचूक अंदाज कळत नाही.

We will install Doppler radar in Aurangabad for accurate weather forecasting | हवामानाच्या अचूक अंदाजासाठी औरंगाबादला ‘डॉप्लर रडार’ बसवू

हवामानाच्या अचूक अंदाजासाठी औरंगाबादला ‘डॉप्लर रडार’ बसवू

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांसह उद्योजकांना होणार फायदा ऐतिहासिक स्थळांचे ‘टुरिझम सर्किट’ तयार करण्यात येत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज कळला तर अतिवृष्टी, ढगफुटी अथवा दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देता येईल. याकरिता औरंगाबाद येथे डॉप्लर रडार अथवा एक्स-बॅण्ड बसविण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे जरूर पाठपुरावा करू, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मंगळवारी निवडक संपादकांशी विविध विषयांवर संवाद साधला. या वेळी झालेल्या चर्चेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दरवर्षीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा करावा लागतो. शिवाय, नजीकच्या काळात औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई-औरंगाबाद औद्योगिक कॉरिडॉर होऊ घातले आहे. परंतु या विभागासाठी हवामान विभागाचे स्वतंत्र केंद्र नसल्यामुळे पावसाचा अचूक अंदाज कळत नाही. त्यासाठी डॉप्लर रडार अथवा एक्स बॅण्ड बसविण्याचा मुद्दा उपस्थित झाला. यासंदर्भात आपण नक्की पाठपुरावा करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टुरिझम सर्किट तयार करणार
जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटकांची संख्या आणि त्यांचा मुक्काम वाढावा यासाठी वेरूळ-अजिंठा, दौलताबाद किल्ला अशा ऐतिहासिक स्थळांचे ‘टुरिझम सर्किट’ तयार करण्यात येत आहे. औरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे काम लवकरच सुरू करीत आहोत. घृष्णेश्वर मंदिर परिसराचा विकास, पैठणचे उद्यान विकसित करण्यात येईल. अजिंठ्याच्या डोंगरावर कास पठारप्रमाणे वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक पर्यटनाबरोबरच आता वैद्यकीय पर्यटनासाठी (मेडिकल टुरिझम) औरंगाबाद नावारूपाला येत आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

खेळाडू दत्तक घेणार
औरंगाबाद जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी ‘खेळाडू दत्तक’ योजना आखण्यात येत आहे. जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांबरोबर तसा करार करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

सांघिक प्रयत्नातून कोरोनावर मात
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने आरोग्य खाते, खासगी रुग्णालये, महापालिका, महसूल, पोलीस, सामाजिक संघटना, नागरिक आणि प्रसार माध्यमांच्या सामूहिक प्रयत्नातून कोरोनाच्या भयंकारी अशा दुसऱ्या लाटेवर यशस्वी मात केली. तिसरी लाट आली तरी त्यावर मात करण्यासाठी प्रशासन पूर्णत: तयार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काय असते डॉप्लर रडार?
या रडारमधून पाठविलेल्या तरंग लहरी एखाद्या वस्तूवर आदळून (उदा. ढग) परततात, तेव्हा त्यातल्या तरंगलांबीचा फरक मोजला जातो. त्यामुळे वस्तूचा वेग, आकार, घनता आदी अनेक बाबी अतिशय अचूक नोंदविता येतात. डॉप्लर रडारचा उपयोग हवामानाखेरीज हवाईदल, एअर ट्रॅफिक कंट्रोल, रेडिओलॉजीमध्येही केला जातो.

सैन्य भरती करणार
औरंगाबाद येथे लवकरच विद्यापीठाच्या ग्राउंडवर सैन्य भरती करण्यात येईल. उमेदवारांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येतील, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: We will install Doppler radar in Aurangabad for accurate weather forecasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.