अडीच महिन्यांत तीनदा पाणी तुंबले; पत्रे टाकून शिवाजीनगर भुयारी मार्गाची दुरावस्था थांबेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:54 IST2025-08-09T12:51:54+5:302025-08-09T12:54:06+5:30

१६ महिने काम; साडेअकरा कोटींचा खर्च, तरीही नागरिक व व्यावसायिकांचे हाल मात्र सुरूच

Waterlogging occurred three times in two and a half months; Will the situation be stopped by leaving letters on the Shivajinagar subway? | अडीच महिन्यांत तीनदा पाणी तुंबले; पत्रे टाकून शिवाजीनगर भुयारी मार्गाची दुरावस्था थांबेल का?

अडीच महिन्यांत तीनदा पाणी तुंबले; पत्रे टाकून शिवाजीनगर भुयारी मार्गाची दुरावस्था थांबेल का?

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्ग पूर्ण करण्यासाठी १ वर्षाची मुदत होती. मात्र, या मुदतीत भुयारी मार्ग पूर्ण झाला नाही. फेब्रुवारीत कसाबसा भुयारी मार्ग खुला झाला. परंतु, पाण्याचा निचरा करण्याचे काम, छताचे काम बाकीच आहे. परिणामी, वाहनधारकांसह नागरिकांना वारंवार फटका बसत आहे. भुयारी मार्ग तयार होऊनही शहरातून देवळाई-सातारा परिसराकडून ये-जा करणारी वाहतूक सुरळीत व्हावी, हा मूळ हेतू सफल होत नाही.

भुयारी मार्गानंतर व्यवसायात ४० टक्के घट
भुयारी मार्गाच्या दुतर्फा जवळपास ५० दुकाने आहेत. भुयारी मार्गातून पादचारी, वाहनधारक ये-जा करतात. त्यामुळे व्यवसायात जवळपास ४० टक्के घट झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

अडीच महिन्यांत ३ वेळा तुंबले पाणी
१८ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि दुरवस्था समोर आली. त्यानंतर १२ जुलै व २५ जुलै रोजी पुन्हा या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.

११.४७ कोटी निधी खर्च
शिवाजीनगर भुयारी मार्गाची ३.५ मीटर उंची आहे. या मार्गासाठी ११.४७ कोटी निधी खर्च झाला. मात्र, भुयारी मार्गात पाणी एकीकडे साचते आणि पाणी निचरा होण्याची जागा दुसरीकडे, अशी अवस्था आहे.

१२ महिने होती मुदत, प्रत्यक्षात १६ महिने
शिवाजीनगर भुयारी मार्ग प्रकल्प १५ ऑक्टोबर २०२३ ते १५ ॲाक्टोबर २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, काम कासवगतीने चालले. त्यामुळे ४ महिने अधिक लागले. त्यातही अनेक कामे अर्धवट असताना भुयारी मार्गाचे १५ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. अद्यापही प्रकल्प अपूर्णच आहे.

व्यवसायावर परिणाम
भुयारी मार्ग झाल्यापासून व्यवसायात जवळपास ४० ते ५० टक्के घट झाली आहे. पत्रे बसविल्यानंतर भुयारी मार्गात पाणी तुंबणार नाही, अशी शक्यता वाटत नाही.
- रवींद्र पवार, व्यावसायिक

आता पुन्हा मार्ग बंद नको
भुयारी मार्ग आता पुन्हा कधी बंद होता कामा नये. तो कायम सुरू राहील, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. नागरिकांची पुन्हा गैरसोय होता कामा नये.
- आबासाहेब आहेर, नागरिक

Web Title: Waterlogging occurred three times in two and a half months; Will the situation be stopped by leaving letters on the Shivajinagar subway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.