दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून जाणार पाणी; फडणवीस मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 01:01 PM2019-07-31T13:01:40+5:302019-07-31T14:03:00+5:30

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Water from Konkan for drought-hit Marathwada; Approval of plans | दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून जाणार पाणी; फडणवीस मंत्रिमंडळाची मान्यता

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून जाणार पाणी; फडणवीस मंत्रिमंडळाची मान्यता

googlenewsNext
ठळक मुद्दे३६0 अब्ज घनफूट पाणी वळविणे शक्यविदर्भालाही फायदा होणार

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातूनपाणी वळविण्याच्या योजनांना मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मराठवाड्यात पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळविणे हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देऊन त्यांची कामे सुरू करण्याचा निर्णय झाला. कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येईल. त्यामार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोहोचून तहानलेल्या मराठवाड्यास मोठा दिलासा मिळणार आहे. 

पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावरील चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाही करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेण्याचा निर्णय झाला. या नदीजोड प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी ३१.६० अब्ज घनफूट, गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा भागात २५.६० अब्ज घनफूट व तापी खोऱ्यासाठी १०.७६अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल.

तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव )

विदर्भालाही फायदा होणार
पूर्व विदर्भात वैनगंगा खोऱ्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. या खोऱ्यातील शंभर अब्ज घनफूट पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलडाणा जिल्'ांसाठी वळविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेचा अभ्यास करुन सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने तयार केला आहे. त्यानुसार गोसीखुर्द प्रकल्पातून स्थानिक नियोजनाला बाधा न आणता वैनगंगेचे अतिरिक्त वाहून जाणारे ६३ अब्ज घनफूट पाणी, अवर्षणप्रवण क्षेत्रात ४२७ किमी लांबीच्या जोड कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने ४० मार्गस्थ साठे भरले जाणार आहेत. त्यासाठी एकूण सहा उपसा स्थळांतून १५५.२५ मीटर उंचीपर्यंत उपसा करणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे पूर्व व पश्चिम विदर्भातील पाण्याचे दुर्भीक्ष्य कमी होण्यास मदत होईल आणि आर्थिक व सामाजिक विकासास गती मिळेल. या योजनेतील जोड-कालव्यासाठीचे भूसंपादन टाळण्यासाठी कालव्याऐवजी नलिका किंवा बोगदा प्रस्तावित करुन त्यासाठी सविस्तर सर्वेक्षण अथवा तांत्रिक अन्वेषनाचे काम त्वरित हाती घेण्यास त्याचप्रमाणे प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.

३६0 अब्ज घनफूट पाणी वळविणे शक्य
पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातील (कोकण) उल्हास, वैतरणा, नार-पार व दमणगंगा खोऱ्यात एकूण ३६० अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. त्यासाठी नवीन नदीजोड योजनांचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण त्वरित हाती घेऊन व्यवहार्य योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहेत. अशा एकूण १४० अब्ज घनफूट पाणी वळविण्यासाठीच्या योजनांची निवड जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे.

Web Title: Water from Konkan for drought-hit Marathwada; Approval of plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.