तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:49 AM2019-07-31T11:49:50+5:302019-07-31T11:53:23+5:30

नांदूर-मधमेश्वरमधून ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Godawari river's water run for the thirsty Marathwada | तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव

तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली

- अझहर शेख  
 

औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा खालावलेला असताना तहानलेल्या मराठवाड्यातील औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पुन्हा नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबेकश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांत रविवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भावली, दारणासह गंगापूर धरणातूनही हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदा-कादवा संगमावर असलेल्या नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्याचे पाचही दरवाजे मंगळवारी (दि.३०) उघडण्यात आले. हे सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने वेगाने जात आहे.
रविवारपासून (दि.२८) इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. यामुळे इगतपुरीतील भावली धरण शंभर टक्के भरले असून, शनिवारपासून (दि.२७) ४८१ क्युसेकने त्यामधून विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच दारणामधूनही १ हजार क्युसेकने विसर्गाला प्रारंभ करण्यात आला. दारणाचा साठा ८५ टक्के झाला आहे.

मंगळवारी दारणामधून १३ हजार, गंगापूर धरणातून ८ हजार ८३३ आणि भावलीमधून ९४८ क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. एखाद्या समुद्राला भरती यावी आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांनी उंचच उंच उसळ्या घ्याव्या याप्रमाणे दृश्य नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यासमोर पहावयास मिळाले. प्रचंड वेगाने ५८ हजार क्युसेक (१६४ कोटी १९ लाख ८० हजार लिटर प्रति सेकंद) इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने गोदापात्रातून प्रवाहित झाले आहे. दारणा, भावली गंगापूर धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात एकत्र येते. येथून हजारो क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात निश्चितच वाढ होणार आहे.

गोदावरीने गाठली धोक्याची पातळी
गोदावरीमध्ये गंगापूरमधून मंगळवारी दुपारी ८ हजार ८३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच शहरातदेखील संततधार पहाटेपासून सुरू असल्यामुळे पंचवटी रामकुंडापासून पुढे नदीपात्रात ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून, निफाड तालुक्यातील गोदाकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सायंकाळपर्यंत याच वेगाने विसर्ग सुरू होता. पाणलोटक्षेत्रात पाऊस वाढल्यास विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Godawari river's water run for the thirsty Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.