अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानधन मिळण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:23+5:302021-02-05T04:14:23+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल आणि तितकेच पोलीस कर्मचारी ...

Waiting for officers-employees to receive honorarium | अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानधन मिळण्याची प्रतीक्षा

अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानधन मिळण्याची प्रतीक्षा

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३३ दिवस चालली. यामध्ये सुमारे १२ हजार महसूल आणि तितकेच पोलीस कर्मचारी निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी राबले. यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. निवडणुकीसाठी काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेने राबराब राबून घेतले; परंतु लालफितीच्या कारभारामुळे मानधन मिळालेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ८६५ पैकी ६१७ ग्रामपंचायतींपैकी ५७९ ठिकाणी निवडणुका झाल्या. ३२ ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध, तर ६ ठिकाणी निवडणूक घेतली गेली नाही.

३ कोटींचा सरकारी चुराडा

जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत ग्रामविकास खात्याकडून येणाऱ्या सुमारे ३ कोटी २ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक व्यवस्थापन खर्चात कपात केली असली तरी निवडणूक नियोजनासाठी जेवढा खर्च लागणार आहे, तेवढा करावाच लागला. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुमारे ४९ हजार रुपये प्रशासकीय खर्च झाला. १० हजार रुपयांचा पहिला टप्पा प्रत्येक ग्रामपंचायतीत देण्यात आला होता.

जिल्ह्यातील किती ग्रामंपचांयतींची झाली निवडणूक - ६१७

किती केंद्रांवर झाली निवडणूक - २२६८

अधिकारी किती - १५०

कर्मचारी किती - १२ हजार

दीड कोटींच्या आसपास मानधन

ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन हे विधानसभा आणि लोकसभेच्या तुलनेत कमी असते. ते ठराविक स्वरूपात असले तरी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार ते अदा करण्यात येते. प्रशिक्षण, मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियेसह इतर कामांत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. सर्व ग्रामपंचातींवर काम करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात दीड ते २ कोटींच्या आसपास मानधन वितरित होणे शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागील निवडणुकीचाच खर्च मिळेना

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात २ कोटी रुपयांच्या आसपास खर्च झाला होता

त्यातील बहुतांश रक्कम मध्यंतरी मिळाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधन उशिरा देण्यात आले होते. मागील निवडणुकीत सहा महिन्यांनंतर मानधन मिळाले होते. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक खर्च मोठा असल्यामुळे त्यासाठी तातडीने तरतूद होते. त्यात मानधन लवकर मिळण्याची प्रक्रिया वेगाने होते.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले

निवडणूक प्रक्रियेतील उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले, अनुदान आले आहे. ते किती आले आहे, ते अद्याप कळलेले नाही. येत्या एक-दोन दिवसांत जे अनुदान आले ते वाटप करण्यात येईल. पूर्ण अनुदान आलेले नाही. मानधन कुणाला किती द्यायचे, ते तहसील पातळीवर ठरविण्यात येते.

Web Title: Waiting for officers-employees to receive honorarium