विद्यादीप बालगृह नव्हे, जेलपेक्षा भयंकर; पलायन केलेल्यांपैकी एका पीडित मुलीची आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:50 IST2025-07-03T15:49:12+5:302025-07-03T15:50:41+5:30

‘घरचा माज इथे दाखवू नका, तुमच्या बापाचा पैसा नाही’; आम्ही पोलिसांकडून येथे आलो आहोत. त्यामुळे संस्थेकडून छळ केला जात असल्याचा आरोपही या मुलींनी केला.

Vidya Deep Not a children's home, but worse than prison; One of the escaped victims told her story | विद्यादीप बालगृह नव्हे, जेलपेक्षा भयंकर; पलायन केलेल्यांपैकी एका पीडित मुलीची आपबीती

विद्यादीप बालगृह नव्हे, जेलपेक्षा भयंकर; पलायन केलेल्यांपैकी एका पीडित मुलीची आपबीती

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : आम्हाला नातेवाईकांशी बोलू दिले जात नाही. जेवायला पोटभर मिळत नव्हते. आमच्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला. आम्ही काय जेलमध्ये बंद आहोत काय? असा प्रश्न सोमवारी येथून पळून गेलेल्या एका अल्पवयीन मुलीने विचारत बालगृह व्यवस्थापनाच्या दमनशाहीवर बोट ठेवले.

या घटनेनंतर मंगळवारी 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत विद्यादीप बालगृहात मुलींच्या मूलभूत स्वातंत्र्य कसे दडपले जात होते ते समोर आले. पळालेल्या मुलींमधील एकीने संस्थेत कशाप्रकारचा छळ सहन केला, याची आपबितीच यावेळी सांगितली. बालगृह नव्हे, हे तर जेलपेक्षा भयंकर असल्याचे मुली म्हणाल्या.

छावणीतील विद्यादीप बालगृहातून नऊ मुली पळून गेल्याची घटना सोमवारी घडली. बालगृहात बालकल्याण समिती आणि महिला व बालकल्याण विभागाकडून दिवसभर चौकशी व मुलींचे जबाबही नोंदविले गेले. जबाब नोंदवणे सुरू असताना एका मुलीने ओढणीने फास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या मुलीला आईच्या स्वाधीन केले आहे. अन्य ६ मुलींनाही पालकांच्या स्वाधीन केले. विद्यादीप बालगृहाशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बालगृहाच्या चौकशीसाठी महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, अॅड. विजय देशमुख, आशा शेरखाने-कटके, अॅड. प्रदीप शिंदे, प्रा. गजानन सूर्यवंशी यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

तुमच्या बापाचे इथे काही नाही
'लोकमत'शी बोलताना कामिनी (नाव बदलले आहे) म्हणाली, पळून जाण्यामागचे कारण म्हणजे घरच्यांशी कुठलाही संपर्क करू दिला जात नाही. जेवायला पोटभर मिळत नव्हते. बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावलेला होता. एक साबणाची छोटी वडी १५-१५ दिवस वापरावी लागायची. शाम्पूही कधीतरी द्यायचे. पोलिसांद्वारे आलेल्या मुलींनाच हा त्रास आहे. तुम्ही घरून माजून येता. इथे तुमच्या बापाचे काही नाही. तुमच्या घरचे पैसे देत नाहीत. शासन फक्त २० रुपये देते. आम्ही तुम्हाला घरातून खाऊ घालतो, असे कर्मचारी म्हणायचे. काही मुलींनी कॅमेरे तोडले, लॅच तोडले. हातावर ब्लेड मारून घेत आम्ही पळालो. 

संस्थेकडून छळाचा आरोप
सर्वाधिक मुली विद्यादीप बालगृहात राहतात. ज्या ९ मुलींनी पळ काढला, त्या पोलिसांच्या मध्यस्थीने येथे आल्या होत्या. त्यांच्याच २ खोल्यांमध्ये सीसीटीव्ही लावल्याचा मुलींचा आरोप आहे. तसेच आम्ही पोलिसांकडून येथे आलो आहोत. त्यामुळे संस्थेकडून छळ केला जात असल्याचा आरोपही या मुलींनी केला.

पीडितेला चार तास बाहेर बसवले
विद्यादीप बालगृहात बालकल्याण समितीचा दिवसभर राबता होता. यावेळी येथे पोक्सो बलात्कार प्रकरणातील १२ वर्षांच्या एका पीडित मुलीला, जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील दोन महिला पोलिस घेऊन आल्या होत्या. बालकल्याण समितीसमोर तिला सादर करायचे होते. यासाठी सकाळी ११.०० वाजेपासून पोलिस, मुलगी, तिची आई संस्थेच्या पायऱ्यांवर बसल्या होत्या. नुकतेच मेडिकल करून आणलेल्या या मुलीला विद्यादीप संस्थेने आतही प्रवेश दिला नाही. माणुसकीच्या नात्याने पाणीदेखील त्यांना विचारण्यात आले नाही. पीडितेची तब्येत खालावल्यानंतर शेवटी बालकल्याण समितीला जाग आली आणि त्यांना आत जागा देण्यात आली.

चौकशी सुरू
बालगृहाची चौकशी अजूनही सुरू आहे. आठ मुलींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाला या घटनेचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतरच विद्यादीपवर काय कारवाई करायची ते ठरविले जाईल.
-रेश्मा चिमंद्रे, महिला व बालविकास अधिकारी

शहरात तीन ठिकाणी मुलींना आश्रय
विद्यादीप- ८० मुली
भगवानबाबा- ५५
सावली- २७

Web Title: Vidya Deep Not a children's home, but worse than prison; One of the escaped victims told her story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.