बेमोसमी पावसाचा फटका आता भाजीमंडईला; आज कोणती भाजी खरेदी करावी; हा गृहिणींना प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:00 IST2025-11-11T16:59:51+5:302025-11-11T17:00:02+5:30
अडत बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक ५० टक्क्याने कमी झाली आहे. याचा परिणाम थेट शहरातील विविध ठिकाणी असलेल्या भाजीमंडईत पाहण्यास मिळाला.

बेमोसमी पावसाचा फटका आता भाजीमंडईला; आज कोणती भाजी खरेदी करावी; हा गृहिणींना प्रश्न
छत्रपती संभाजीनगर : बेमोसमी पावसाने शेतातील पिकांची वाट लावून टाकली... शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. आता याची झळ भाजीमंडईत जाणवू लागली आहे. पालेभाज्या असो वा फळभाज्यांचे भाव वाढले आहेत. सर्वसामान्य घरातील गृहिणींचे महिन्याचे गणित बिघडू लागले आहे. ‘आज कोणती भाजी खरेदी करायची,’ असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.
५० टक्क्याने आवक घटली
जाधववाडी अडत बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक ५० टक्क्याने कमी झाली आहे. याचा परिणाम थेट शहरातील विविध ठिकाणी असलेल्या भाजीमंडईत पाहण्यास मिळाला. कोथिंबीर जुडी २० रुपये, तर ४० रुपये भेलापर्यंत जाऊन पोहोचली आहे. पालक २५ रुपये जुडी म्हणजे पहिल्यांदा मेथीपेक्षा १० रुपयांनी पालक भाजी जास्त भावात विकत आहे.
भाजी----- २५ ऑक्टोबर -- १० नोव्हेंबर
कोथिंबीर १० रु. --- २० रु. (जुडी)
कोथिंबीर भेला ३० रु. --- ५० रु.
मेथी १० रु. --- २० रु.
पालक १५ रु.-- २५ रु.
शेपू १० रु. -- २० रु.
करडी १० रु. -- १५ रु.
फळभाज्यांचे दर किलोप्रमाणे
काकडी ३० रु. --६० रु.
गवार १०० रु. -- १४० रु.
शेवगा शेंग १०० रु. -- १६० रु.
दोडके ६० रु. -- १०० रु.
वांगे ७० रु. -- १२० रु.
शिमला मिरची ६० रु. -- ८० रु.
कांदा २० रु. -- ३० रु.
बटाटा ३० रु. -- ४० रु.
फुलकोबी ६० रु. -- ८० रु.
बिन्स ८० रु. -- १२० रु.
भेंडी ८० रु. -- १०० रु.
महिनाभर अशीच परिस्थिती
बेमोसमी पावसाने भाज्या खराब झाल्या. त्याचा परिणाम आता भाजीमंडईत तीव्रतेने जाणवत आहे. या महागाईला लग्नसराईची जोड मिळाली आहे. आणखी महिनाभर अशीच परिस्थिती राहील.
- संजय वाघमारे, भाजीविक्रेता
कोणती भाजी खरेदी करावी प्रश्न
मुलांना भेंडीची भाजी सर्वाधिक आवडते, पालेभाज्या नकोच म्हणतात. मात्र, सध्या सर्वच भाज्या महागल्या आहेत. शेतकऱ्यांना बेमोसमी पावसाचा जसा फटका बसला तो मोठा आहे. पण आमचेही घरगुती बजेट बिघडले आहे. उद्या कोणती भाजी खरेदी करायची, असा प्रश्न पडत आहे.
- वैशाली देशपांडे, गृहिणी