शहर व परिसरात अंडरग्राऊंड वायरिंग सिस्टीम हवी...
By Admin | Updated: August 19, 2014 02:17 IST2014-08-19T02:01:12+5:302014-08-19T02:17:01+5:30
नजीर शेख , औरंगाबाद नियोजनबद्ध शहर, नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता, तसेच दर्जेदार आणि विनाअडथळा वीजसेवेसाठी शहरात आणि शहराच्या परिसरात नव्याने विकसित होत

शहर व परिसरात अंडरग्राऊंड वायरिंग सिस्टीम हवी...
नजीर शेख , औरंगाबाद
नियोजनबद्ध शहर, नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता, तसेच दर्जेदार आणि विनाअडथळा वीजसेवेसाठी शहरात आणि शहराच्या परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या गावांमध्ये ‘अंडरग्राऊंड वायरिंग सिस्टीम’ असायला हवी, असे मत महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास म्हस्के यांनी व्यक्त केले.
‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एक सरकारी कंपनीचा अधिकारी म्हणून मला देशांतील अनेक ठिकाणी तसेच परदेशात जायची संधी मिळाली. अनेक शहरांमध्ये अंडरग्राऊंड केबल सिस्टीम आहे. आपल्या शहरात व आसपासच्या गावांमध्ये ‘ओव्हरहेड वायरिंग’ (डोक्यावरू न जाणारी) सिस्टीम आहे. अनेक ठिकाणी आधी विजेची वायर टाकली जाते. नंतरच्या काळात तिथे वसाहती होतात व नंतर नागरिकांच्या तक्रारी येतात की, आमच्या घरावरू न वायर जात आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. शहरातील अनेक वसाहती या अशा मृत्यूच्या तोंडाशी वसलेल्या आहेत. आपल्या शहरातील जुन्या भागात ‘ड्रम’ प्रोेजेक्टअंतर्गत काही ठिकाणी भूमिगत वीज केबल टाकण्यात आली आहे. मात्र, संपूर्ण शहरात अजून ही व्यवस्था नाही. विद्युत लाईनसाठी सुरक्षित बेल्ट ही कल्पना अजून आपल्या शहरात रुजली नाही.
औरंगाबाद शहराच्या आसपास बिडकीन आणि शेंद्रा परिसरात डीएमआयसीमध्ये स्मार्ट सिटी वसणार आहे. ही वसाहत नियोजनबद्ध असेल; मात्र त्याचवेळी त्या शहराच्या आसपास वाढणाऱ्या वसाहतींमध्ये अशी सुविधा असेलच असे सांगता येत नाही. कोणत्याही शहराच्या आराखड्यात आता पॉवर केबलिंगचे नियोजन असणे, त्यासाठी डक्ट आणि ट्रान्समिशन लाईन असणे आवश्यक ठरते. यामुळे शहराची सुंदरता वाढण्यास मदत होते. शहराचा एक नागरिक म्हणून मला असे वाटते की, शहरात विजेसाठी ‘अंडरग्राऊंड केबलिंग’ करावयाची झाल्यास पैसा लागेल. मात्र, त्याची तयारी महापालिका तसेच महावितरण किंवा जीटीएल यांना करावी लागेल. अरुंद गल्ल्यांमध्येही आपण अंडरग्राऊंड केबलिंग करू शकतो. हा खर्च मोठा आहे. मात्र, नियोजनबद्ध शहर म्हणून हे आपल्याला करावे लागेल.