दोन जीवलग मित्रांनी ठरवून संपवली जीवनयात्रा; व्हाॅट्सॲपवर स्टेटसही ठेवले, आईला पाठवला मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:13 IST2026-04-29T10:13:14+5:302026-04-29T10:13:36+5:30
दोघांनी रात्री दोन पाण्याच्या बाटल्या, दोन विदेशी दारूच्या बाटल्या आणि विषारी औषधाचा डबा सोबत घेतला होता.

दोन जीवलग मित्रांनी ठरवून संपवली जीवनयात्रा; व्हाॅट्सॲपवर स्टेटसही ठेवले, आईला पाठवला मेसेज
पैठण (छत्रपती संभाजीनगर) : ‘मी जीवन संपवत आहे..’ असा आईला मेसेज पाठवला. व्हॉट्सॲपवर तोच स्टेट्स ठेवला. दोन पाण्याच्या बाटल्या, दोन विदेशी दारूच्या बाटल्या आणि सोबत विषारी औषधाचा डबा आणि एकाच मोटारसायकलवरून ते गेले ते पुन्हा न परतण्यासाठीच. दोन मित्रांनी शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री जपली पण चटका लावणारी एक्झिट घेऊन.
बिडकीन एमआयडीसी (ता. पैठण) परिसरात मंगळवारी पहाटे दोन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. गणेश झिरपे (२३, रा. सूर्य उद्योग नगर, बिडकीन) आणि सचिन आरगडे (२९, रा. धनगर पिंपरी, जि. जालना) अशी त्यांची नावे असून, दोघे जिवलग मित्र होते. बिडकीन पोलिसांनी सांगितले, की या दोघांनी रात्री दोन पाण्याच्या बाटल्या, दोन विदेशी दारूच्या बाटल्या आणि विषारी औषधाचा डबा सोबत घेतला होता. एकाच मोटारसायकलवर बसून ते डीएमआयसी परिसरात गेले आणि तिथे जीवनयात्रा संपवली.
एआयडीसी परिसरातील २ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
गणेश झिरपे यांची आई लग्न सोहळ्यांमध्ये केटरर्सकडे स्वयंपाकाचे काम करते. मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही तरुण हॉटेल कामगार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हे पाऊल नेमके का उचलले? याचे गूढ अद्याप कायम आहे. बिडकीन पोलिस या प्रकरणाचा वेगाने तपास करीत आहेत.