लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या गाडीला अपघात, नवरदेवासह दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 12:16 IST2018-05-09T07:47:37+5:302018-05-09T12:16:06+5:30
औरंगाबाद-बीड मार्गावर बुलेरो कार-दुधाच्या गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.

लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या गाडीला अपघात, नवरदेवासह दोघांचा मृत्यू
औरंगाबाद - जालना-बीड मार्गावर बुलेरो कार व दुधाच्या गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या गाडीला अपघात झाला आहे. या दुर्घटनेत नवरदेवासहीत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. नवरदेवाच्या मावस बहिणीचा मृतांमध्ये समावेश आहे. बुधवारी (9 मे) पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील रहिवासी शंकर गोडसे यांचा मुलगा अमितचा 4 मे रोजी राजूरमध्ये विवाहसोहळा पार पडला. यानंतर अमित व नववधू काही नातेवाईकांसोबत देवदर्शनासाठी तुळजापूर येथे गेले होते. देवदर्शनानंतर गोडसे कुटुंबीय औरंगाबादकडे परतत होते. अमित स्वत: यावेळी जीप चालवत होता. अंबडजवळच्या गोंदी शिवारात प्रवेश केल्यानंतर अमितच्या गाडीची समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरला जोरात धडक बसली. यात नवरदेव अमित आणि त्याची मावस बहिण वंदना चौधरीचा जागीच मृत्यू झाला. तर नववधूसहीत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.