छत्रपती संभाजीअंगार जिल्ह्यात अपघातांच्या दोन घटनांमध्ये दोन ठार; महिला गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:31 IST2025-08-12T14:31:22+5:302025-08-12T14:31:44+5:30

आयशरच्या धडकेत मुलगा ठार, तर आई गंभीर जखमी झाली आहे

Two killed in two accidents in Chhatrapati Sambhaji Angar district; Woman critical | छत्रपती संभाजीअंगार जिल्ह्यात अपघातांच्या दोन घटनांमध्ये दोन ठार; महिला गंभीर

छत्रपती संभाजीअंगार जिल्ह्यात अपघातांच्या दोन घटनांमध्ये दोन ठार; महिला गंभीर

सिल्लोड/वैजापूर : सिल्लोड-भोकरदन रस्त्यावरील वरूड-पिंपरी फाट्यावर रविवारी सायंकाळी ७:२५ वाजता रस्ता ओलांडणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरी घटना वैजापूर-गंगापूर रस्त्यावर जांबरगाव शिवारात घडली असून यात दशक्रियेच्या कार्याहून परतताना दुचाकीस्वार मुलगा व आईला भरधाव आयशरने जोराची धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला, तर आई गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या झाला. पंकज कौतिक शिरसाट (वय २६, रा. पिंपरी-वरूड, ता. सिल्लोड) व सचिन सुखदेव वाहूळ (वय ३५, रा. धामणगाव (ता. येवला) अशी मयतांची नावे आहेत.

पिंपरी-वरूड येथील पंकज कौतिक शिरसाट हा रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सिल्लोड-भोकरदन रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. त्यानंतर वाहनचालक फरार झाला. नातेवाईक भाऊसाहेब शिरसाट यांनी पंकजला तातडीने सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पंकजच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता पिंपरी येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंकजच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आयशरच्या धडकेत मुलगा ठार, आई गंभीर
दुसऱ्या घटनेत धामणगाव (ता. येवला) येथील सचिन सुखदेव वाहूळ व त्याची आई शशीकला सुखदेव वाहूळ (वय ५५) यांच्यासोबत वडाळा बहिरोबा (ता. गंगापूर) येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते. सायंकाळी गावाकडे परतताना जांबरगाव शिवारात समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने (एमएच २० डीइ ७४४५) त्यांच्या दुुचाकीला (एमएच १५ डीआर ९१४३) जोराची धडक दिली. यात सचिन वाहूळ ठार झाले. वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या त्यांच्या आई शशीकला यांना छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली.

Web Title: Two killed in two accidents in Chhatrapati Sambhaji Angar district; Woman critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.