वैजापूर-गंगापूर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:34 IST2025-11-24T15:33:29+5:302025-11-24T15:34:10+5:30
वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भगूर फाट्याजवळ वाघलगाव शिवारातील घटना

वैजापूर-गंगापूर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार, दोन जखमी
वैजापूर : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले. हा भीषण अपघात शनिवारी सकाळी वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भगूर फाट्याजवळ घडला. ऋषीकेश शिवाजी मिरगे (वय २२, रा. जातेगाव) व नानासाहेब रामचंद्र विखे (वय ६२, रा. भगूर) अशी मृतांची नावे आहेत.
भगूर येथील रहिवासी नानासाहेब विखे व राजेंद्र बाबूराव चव्हाण हे दोघे शनिवारी सकाळी दुचाकीने (एमएच २०-बीझेड २०६७) वैजापूरला येत होते. तर विरुद्ध दिशेने जातेगावचे ऋषीकेश मिरगे व सागर काळे (वय ३०) हे दोघे येत होते. या दोन्ही दुचाकींची चोरवाघलगाव शिवारात भगूर फाट्याजवळील एका जिनिंगसमोर सकाळी ११ वाजता समोरासमोर जोराची धडक झाली. यात दोन्ही दुचाकींवरील चौघेही गंभीर जखमी झाले.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत रुग्णवाहिकेद्वारे चौघांनाही वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून ऋषीकेश मिरगे व नानासाहेब विखे यांना मयत घोषित केले. तर राजेंद्र चव्हाण व सागर काळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली. ऋषीकेश हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. तर मयत नानासाहेब विखे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, व भाऊ असा परिवार आहे.