एकऐवजी अडीच वर्षे लोटली, छत्रपती संभाजीनगरच्या पीटलाइनचे काम टुकूटुकू सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:24 IST2025-11-26T13:21:23+5:302025-11-26T13:24:18+5:30
लोकप्रतिनिधींनी भांडून मिळविलेल्या पीटलाइनकडे ‘दमरे’चे दुर्लक्षच

एकऐवजी अडीच वर्षे लोटली, छत्रपती संभाजीनगरच्या पीटलाइनचे काम टुकूटुकू सुरूच
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगररेल्वे स्टेशनवर पीटलाइनच्या कामासाठी एक वर्षांची मुदत होती. प्रत्यक्षात अडीच वर्षे लोटूनही पीटलाइनचे काम पूर्ण झालेले नाही. जालन्याला पीटलाइन पळविल्यानंतर शहरातील लोकप्रतिनिधींनी भांडून, पाठपुरावा करून पीटलाइन मिळविली. परंतु, प्रत्यक्षात पीटलाइनचे काम गतीने करण्याकडे दक्षिण मध्य रेल्वे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड होत आहे.
अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरला पीटलाइनची प्रतीक्षा होती. परंतु, संभाजीनगरऐवजी जालन्याला पीटलाइन करण्याचा निर्णय झाला. शहरातील लोकप्रतिनिधींनी येथेही पीटलाइन करण्याची मागणी लावून धरली. अखेर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील आणि जालना येथील पीटलाइनच्या पायाभरणीचा समारंभ झाला. पायाभरणीच्या तब्बल ६ महिन्यांनंतर एप्रिल २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर पीटलाइनच्या कामाला सुरुवात झाली. हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. परंतु, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण होण्यास आणखी दोन ते तीन महिने लागणार आहेत. जालना येथील पीटलाइनचे काम पूर्ण होऊन येथे रेल्वेंची दुरुस्तीही होत आहे.
२९ कोटींची पीटलाइन
१६ बोगींची ही पीटलाइन २९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपयांच्या निधीतून होत आहे.
अशी आहे पीटलाइन
- १६ बोगी उभ्या राहू शकतील.
- बोगींचे निरीक्षण, स्वच्छता आणि पाणी भरण्याची सुविधा.
- बोगींच्या स्वच्छतेसाठी स्वयंचलित प्लांट.
नव्या सुरू होण्यास अडचण
एका वर्षाची मुदत होती. मात्र, पीटलाइनचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नव्या रेल्वे सुरू करण्यास अडचण येत आहे. सध्या इलेक्ट्रिकच्या पोलवर अँगल लावण्याचे काम झाले आहे. पुढील काम शिल्लक आहे.
- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती