जायकवाडीत बसले ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप; दिवाळीनंतर २०० एमएलडी वाढीव पाणी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 19:15 IST2025-09-05T19:14:44+5:302025-09-05T19:15:14+5:30

एक पंप २८ टन वजनाचा, उंची २२ मीटर; पंप ज्याठिकाणी बसवायचा त्या ठिकाणपर्यंत नेण्यासाठी क्रेन आणण्यात आली.

Two 3,700 horsepower pumps installed in Jayakwadi; Chhatrapati Sambhajinagar likely to get 200 MLD additional water after Diwali | जायकवाडीत बसले ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप; दिवाळीनंतर २०० एमएलडी वाढीव पाणी मिळण्याची शक्यता

जायकवाडीत बसले ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप; दिवाळीनंतर २०० एमएलडी वाढीव पाणी मिळण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरपासून शहराला दररोज पाणी द्या, अशी सूचना केली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नवीन पाणीपुरवठा योजनेला चांगलीच गती दिली. जायकवाडीत मागील १३ दिवसांपासून पाणी उपसा करणारे ३ हजार ७०० अश्वशक्तीचे दोन मोठे पंप बसविण्याचे काम सुरू होते. गुरुवारी सायंकाळी हे दोन्ही पंप यशस्वीरीत्या बसविण्यात यश आले. नियोजित वेळापत्रकानुसार सर्व कामे पूर्ण झाल्यास दिवाळीनंतरच शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी मिळू शकते.

सध्या शहराला २६ एमएलडी वाढीव पाणी मिळत आहे. जलपूजनासाठी दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारोळा येथे आले होते. त्यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर पाणीपुरवठा योजनेच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. जायकवाडी धरणातून दररोज २०० एमएलडी पाणी उपसण्यासाठी ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप बसवण्याचे काम गुरुवारी पूर्ण झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले की, धरण पूर्णपणे भरलेले आहे. त्यात दोन पंप बसविण्याचे काम सुरू करण्यात आले.

योजनेतील सर्वांत मोठे काम
१) एका पंपाचे वजन २८ टन आहे. पंप ज्याठिकाणी बसवायचा त्या ठिकाणपर्यंत नेण्यासाठी क्रेन आणण्यात आली. एका पंपाची उंची २२ मीटर आहे. या पंपांवर आता स्लॅब टाकण्यात येणार आहे.
२) १५ ऑक्टोबरपर्यंत मोटार बसवण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असेही मजीप्रा अधिकाऱ्यांनी नमूद केले. दिवाळीच्या सुमारास किंवा नंतर २०० एमएलडी पाण्याची चाचणी सुरू करण्याचा प्रयत्न असेल.
३) जायकवाडीत ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप बसवण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनीदेखील दिली. निर्धारित वेळेत काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Two 3,700 horsepower pumps installed in Jayakwadi; Chhatrapati Sambhajinagar likely to get 200 MLD additional water after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.