ट्रक लंपास करून ६२ गॅस सिलिंडर चोरणारे त्रिकूट अटकेत; मदत करणारे, खरेदीदारही अडकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:50 IST2026-01-02T19:50:37+5:302026-01-02T19:50:51+5:30
पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळून ६० सिलिंडर जप्त केले.

ट्रक लंपास करून ६२ गॅस सिलिंडर चोरणारे त्रिकूट अटकेत; मदत करणारे, खरेदीदारही अडकले!
छत्रपती संभाजीनगर : नारेगावातून गॅस सिलिंडरचा ट्रक लंपास करून ३४० पैकी ६२ गॅस सिलिंडर चोरून झाल्टा फाटा परिसरात ट्रक सोडून पसार झालेल्या विजय उर्फ गुड्डू विश्राम पवार (वय ३८, रा. नारेगाव) याला गुन्हे शाखेने अटक केली. या गुन्ह्यात त्याला मदत करून सिलिंडर खरेदी करणाऱ्या अक्षय गणेश साेळुंके (२७, रा. मूर्तिजापूर) व एजन्सीचालक जगदीश उर्फ जिगर राजेंद्र पटेल (३८, रा. घोडेगाव, ता. नेवासा) यांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळून ६० सिलिंडर जप्त केले.
ट्रकचालक सुंदर मुंढे (३८, रा. पिसादेवी) हे एचपीसीएल कंपनीसाठी गॅस सिलिंडर ट्रकचे चालक आहेत. २३ डिसेंबर रोजी रात्री त्यांनी एचपीएसीएल कंपनीसमोर उभा केलेला ट्रक रात्रीतून चोरीला गेला. शोध घेतल्यावर तो झाल्टा फाटा परिसरात दिसला. मात्र, त्यातील ६२ सिलिंडर कमी आढळले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक प्रवीण वाघ याप्रकरणी तपास करत होते. त्यात हा प्रकार ट्रक चालकच असलेल्या विजयने केल्याची माहिती त्यांना मिळाली. अंमलदार योगेश नवसारे, विजय निकम, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, सोमनाथ दुकले यांच्यासह त्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
एजन्सीचालकही अटकेत
ही चोरी करण्यात मदत करून ६२ पैकी १० सिलिंडर विकत घेणाऱ्या अक्षयचे नाव चौकशीत समोर आले. शिवाय, पवारनेच घोडेगावच्या गॅस एजन्सीचालक पटेलला ५० सिलिंडर विकल्याची कबुली दिली. त्यानंतर फौजदार वाघ यांनी घोडेगाव गाठत पटेलला अटक करून त्याच्या एजन्सीमधून ५० सिलिंडर जप्त केले.