मनमानी भाडे घेणाऱ्या ट्रॅव्हल्स ‘रडार’वर; प्रवाशांनो तक्रार करा, आरटीओ करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:47 IST2025-10-14T19:46:43+5:302025-10-14T19:47:03+5:30
ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सचालकांकडून अनेक मार्गांवर मनमानी भाडे आकारणी केली जात आहे.

मनमानी भाडे घेणाऱ्या ट्रॅव्हल्स ‘रडार’वर; प्रवाशांनो तक्रार करा, आरटीओ करणार कारवाई
छत्रपती संभाजीनगर : एसटी तिकीटदराच्या तुलनेत खासगी वाहनांना जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याची मुभा आहे. परंतु हा नियम फक्त कागदावरच आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सचालकांकडून अनेक मार्गांवर मनमानी भाडे आकारणी केली जात आहे. असे ट्रॅव्हल्सचालक आरटीओ कार्यालयाच्या ‘रडार’वर असून, अधिक भाडे आकारणाऱ्यांची प्रवाशांनी तक्रार करावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले आहे.
महामंडळाची काही मार्गांवर वातानुकूलित एसटी सिटिंग बससेवा आहे. त्याच मार्गावर ट्रॅव्हल्सची स्लिपर बससेवा असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळेदेखील एसटी आणि ट्रॅव्हल्सच्या दरात फरक पडत असल्याचा दावा खासगी वाहतूकदारांकडून केला जातो. शिवाय खासगी वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्यात आले आहे. यानुसार एसटी तिकीटदराच्या तुलनेत खासगी वाहनांना जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याची मुभा आहे; शिवाय जीएसटी वेगळा आकारला जातो. त्यामुळे भाडे अधिक वाटते. परंतु काही मार्गांवर एसटीपेक्षा ट्रॅव्हल्सचे दर कमी असल्याचे ट्रॅव्हल्सचालकांनी सांगितले.
अधिक भाडे आकारू नये
एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्सला जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येते. त्यापेक्षा अधिक भाडे ट्रॅव्हल्सचालकांनी आकारता कामा नये. कोणी यापेक्षा अधिक भाडे आकारत असतील तर प्रवाशांनी आरटीओ कार्यालयाकडे तक्रार करावी.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी