शेतकऱ्यांची व्होटबॅंक झाल्याशिवाय परिवर्तन अशक्य : अशोक ढवळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:19 IST2025-05-15T18:16:52+5:302025-05-15T18:19:26+5:30
येत्या १ जून रोजी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलन करण्यात येणार

शेतकऱ्यांची व्होटबॅंक झाल्याशिवाय परिवर्तन अशक्य : अशोक ढवळे
छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. ती काॅर्पोरेट जगताला पूरक आहेत. हे चित्र बदलण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जशी शेतकऱ्यांची व्होट बॅंक तयार झाल्याचे दिसून आले, तशी व्होट बॅंक आगामी निवडणुकांमध्ये दिसून आली तरच परिवर्तन शक्य होईल, असा विश्वास बुधवारी सायंकाळी पत्र परिषदेत अ. भा. किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे व कॉ. अजित नवले यांनी व्यक्त केला.
भारत-पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांनी करावी, हे आश्चर्यकारक असून हे चुकीचे घडले, असे मत त्यांनी व्यक्त केले. येत्या १ जून रोजी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. छत्रपती संभाजीनगर व पैठण येथे हे अंदोलन होईल, असे कॉ. भगवान भोजने यांनी सांगितले. ढवळे यांनी आरोप केला की, कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक होत आहे. लाडक्या बहिणींसाठी समाजकल्याण व आदिवासी खात्याचा निधी वळवण्यात येत आहे.
कमिशन खाण्याची सोय
कसेल त्याची जमीन इतक्या वर्षांनंतरही होत नाही. ६ ते ७ लाख एकर जमीन देवस्थान इनामी जमिनीची आहे. कसणाऱ्यांच्या नावावर ही जमीन झाली पाहिजे, अशी किसान सभेची मागणी आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी भूमी अधिग्रहण सुरू आहे. मुळात या शक्तिपीठाची गरजच काय, असा सवाल करून डॉ. ढवळे यांनी, ही कमिशन खाण्याची सोय असल्याचा आरोप केला. पत्रपरिषदेस विनोद निकोले, कॉ. मंगल ठोंबरे, ॲड. सचिन गंडले यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.