छत्रपती संभाजीनगरजवळ मजूरांच्या रिक्षाला ट्रॅक्टर धडकला, महिला ठार, ८ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:15 IST2025-12-03T17:12:21+5:302025-12-03T17:15:01+5:30
पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील ईसारवाडी शिवारातील घटना

छत्रपती संभाजीनगरजवळ मजूरांच्या रिक्षाला ट्रॅक्टर धडकला, महिला ठार, ८ गंभीर
जायकवाडी : ट्रॅक्टर व ॲपेरिक्षात झालेल्या जोराच्या धडकेत ॲपेरिक्षामधील एक महिला मजूर ठार झाली. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहे. हा भीषण अपघात पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील ईसारवाडी शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजता घडला. मेहमुदा लाला शेख (वय ६६, रा.पिंपळवाडी पिराची, ता.पैठण) असे घटनेतील मयत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पिंपळवाडी पिराची येथून धनगावकडे एका ॲपेरिक्षात (क्र. महा.२०.टी.३४५१) आठ महिला मजूर कामाला निघाल्या होत्या. ईसारवाडी शिवारात सकाळी ९ वाजेदरम्यान दुभाजकामधून रस्ता ओलांडणाऱ्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीला (क्र. महा.२०.जीके. ५२३२) पाठीमागून ही ॲपेरिक्षा जोरात धडकली. या अपघातात ॲपेरिक्षामधील चालक शाहरुख शेख (वय २२),मेहमुदा लाला शेख, नजमा कादर शेख (वय ४०), दीक्षा कमलेश जगताप (वय २०), बानु रियाज शेख (वय २०), शाबिया अब्दुला शेख (वय ३०), शबाना मोहम्मद शेख (वय ५०), फरजाना शेख (वय ३०), सरताज शेख (वय ३०) हे गंभीर जखमी झाले.
अपघात एवढा भीषण होता की, ॲपेरिक्षाचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला होता. माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत जखमींना दोन रुग्णवाहिकेतून पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान मेहमूदा लाला शेख यांचा मृत्यू झाला. तर इतरांवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात जमा केली असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.