जातेगाव घाटातून ट्रॅक्टर दरीत कोसळून अपघात: मृतांचा आकडा तीनवर, १५ भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:56 IST2025-08-21T19:56:05+5:302025-08-21T19:56:44+5:30

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता

Tractor accident at Jategaon Ghat: Death toll rises to three, 15 devotees injured | जातेगाव घाटातून ट्रॅक्टर दरीत कोसळून अपघात: मृतांचा आकडा तीनवर, १५ भाविक जखमी

जातेगाव घाटातून ट्रॅक्टर दरीत कोसळून अपघात: मृतांचा आकडा तीनवर, १५ भाविक जखमी

चापानेर: पिनाकेश्वर महादेव मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला जातेगाव घाटात भीषण अपघात झाला. रविवारी (१७ ऑगस्ट) झालेल्या या घटनेत सुरुवातीला दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर २५ जण जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान आणखी एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता तीन झाली आहे.

श्रावण महिन्यानिमित्त खामगाव (ता. कन्नड) येथील भाविक पिनाकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना जातेगाव घाटात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट दरीत कोसळला. हा अपघात रविवारी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास झाला.

दोन महिलांचा जागीच मृत्यू
या अपघातात कांता नारायण गायके (वय ५५, रा. खामगाव) आणि कमलबाई शांताराम जगदाळे (वय ६०, रा. जानेफळ, ता. वैजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात १५ हून अधिक पुरुष, महिला आणि लहान मुले जखमी झाली. जखमींना तातडीने खाजगी वाहनांच्या मदतीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले.

उपचारादरम्यान तिसरा बळी
अपघातात गंभीर जखमी झालेल्या भक्ती आप्पासाहेब राऊत (वय १४, रा. खामगाव) हिचा छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळी १० वाजता मृत्यू झाला. यामुळे अपघातातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.

Web Title: Tractor accident at Jategaon Ghat: Death toll rises to three, 15 devotees injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.