नोकरीवरून काढण्याची धमकी देत अत्याचार, ब्लॅकमेलिंग; माजी सभापतीच्या पतीचा कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:10 IST2025-08-12T18:08:01+5:302025-08-12T18:10:35+5:30
बीड जिल्ह्यातील गेवराईच्या राजकीय कुटुंबातील तरुणावर बलात्काराचा गुन्हा, पोलिस घरी पोहोचण्यापूर्वीच पसार

नोकरीवरून काढण्याची धमकी देत अत्याचार, ब्लॅकमेलिंग; माजी सभापतीच्या पतीचा कारनामा
छत्रपती संभाजीनगर : नोकरीवरून काढण्याची धमकी देत शासकीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गेवराई पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती तथा एका राजकीय पक्षाच्या माजी तालुकाध्यक्षाचा मुलगा दीपक प्रकाश सुरवसे (रा. खांडवी, गेवराई, जिल्हा बीड) याच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३५ वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. २०१९मध्ये तक्रारदार महिला शासकीय सेवेत रुजू झाली. त्यावेळी दीपकची पत्नी पंचायत समिती सभापती पदी नियुक्त होती; परंतु त्यांच्याऐवजी दीपकच पंचायत समीतीचे सर्व काम पाहत होता. कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेत सूचना करत होता. त्यामुळे तक्रारदार महिला व दीपकची ओळख होती. तक्रारीत नमूद आरोपानुसार, २०२२ मध्ये विभागाच्या कामाचे कारण करून दीपकने महिलेला शहरातील वेदांतनगरमधील एका बड्या हॉटेलमध्ये बोलावले. तेथील खोलीत बोलावून महिलेसोबत जबरदस्ती केली. महिलेने त्याला विरोध केला. मात्र, दीपकने ‘तुला नोकरी गमवावी लागेल,’ अशी धमकी देत अत्याचार केला.
ब्लॅकमेल करण्यास सुरुवात
व्हिडीओ, छायाचित्राचा आधार घेत दीपकने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. कुटुंबाला व्हिडीओ, छायाचित्र पाठविण्याची धमकी देत महिलेवर इगतपुरी, नाशिक, शहरातील पडेगाव भागात अत्याचार केले. बदनामीच्या भीतीने महिला त्याचा छळ सहन करत होती. मे २०२५ मध्ये त्याने महिलेला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्याच्या छळाला कंटाळून महिला काही महिन्यांपूर्वी शहरात स्थायिक झाली. २ जुलै रोजी दीपकने शहरात येऊन, महिलेच्या घराजवळ मोठमोठ्याने गोंधळ घातला. मुलांना व्हिडीओ दाखवण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. ३ जुलै रोजी महिलेने त्याच्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा त्याच्या वडिलांनी देखील महिलेला शिवीगाळ करून तक्रार केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी देत हाकलून लावले.
बीडवरून शहरात अर्ज वर्ग
महिलेने याप्रकरणी बीड पोलिसांकडे तक्रार केली. बीड पोलिसांनी ती शहर पोलिसांकडे वर्ग केली. वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अटकेसाठी त्याच्या घरी जाण्यापूर्वीच दीपक पसार झाला होता. त्याला लवकरच अटक केली जाईल, असे वेदांतनगरच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी सांगितले.