आवक वाढल्याने टोमॅटोचे कॅरेट हजारावरून दोनशेवर; शेतकऱ्यांनी जालना महामार्ग रोखला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:07 IST2025-08-23T14:06:24+5:302025-08-23T14:07:39+5:30
पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली आणि घसरले दर; पोलिसांनी धाव घेत मार्ग केला मोकळा

आवक वाढल्याने टोमॅटोचे कॅरेट हजारावरून दोनशेवर; शेतकऱ्यांनी जालना महामार्ग रोखला
- श्रीकांत पोफळे
करमाड : जुलै महिन्यापासून करमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची खरेदी-विक्री सुरू आहे. मात्र, अचानक टोमॅटोची आवक १० पटीने वाढल्याने बाजार समितीतील टोमॅटो लिलावात दर कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन लिलाव बंद केला व त्यांनी जवळपास १० मिनिटे जालना महामार्ग अडवला. करमाड पोलिसांनी धाव घेत तत्काळ जालना महामार्ग मोकळा करून दिला. सभापती राधाकिसन पठाडे संचालकांसह हजर झाले व त्यांनी लिलाव पुन्हा सुरू करून दिला.
करमाड बाजार समितीत रोज २ ते ३ हजार कॅरेट टोमॅटो विक्रीला येत असताना शेतकऱ्यांना मालाच्या दर्जानुसार प्रति कॅरेट ६०० ते १००० पर्यंत दर मिळत होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी आले. त्यामुळे गुरुवारी अचानक २० हजार कॅरेट टोमॅटोची आवक झाली. जवळपास १० पटीने आवक वाढल्याने बाजार समितीतील व्यापाऱ्यांची क्षमता टोमॅटो खरेदीसाठीची यंत्रणा व वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दर कमी केले. टोमॅटोच्या प्रति कॅरेटला २०० रुपये दर बोली लागल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला. मात्र, इतर ठिकाणी दर कमी होत नाही. मग करमाड बाजार समितीत भाव का कमी करता, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित करत लिलाव बंद करून अचानक जालना महामार्गाकडे धाव घेऊन जालना रोड रोखला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्ग मोकळा करून दिला.
नियोजन करणे शक्य झाले नाही
मालाची मागणी आहे ही गोष्ट खरी आहे. मात्र, करमाड बाजार समितीत अचानक आवक दहा पटीने वाढल्याने येथील व्यापाऱ्यांकडे साठवणुकीसाठी कॅरेट, वाहतुकीच्या गाड्या काहीच उपलब्ध होईना. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त टोमॅटो आल्याने व्यापाऱ्यांना नियोजन करणे शक्य झाले नसल्याने अचानक दर कमी झाला.
-इलियास बेग, (अध्यक्ष अडत व्यापारी संघटना, करमाड)
खरेदी सुरळीत
पावसाने उघडीप दिल्याने काल आणि आज अचानक वीस हजारांपेक्षा जास्त कॅरेट टोमॅटो आले, त्यामुळे व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध होत नसल्याने त्यांनी लिलावात कमी बोली लावली. मात्र, आम्ही शेतकरी व्यापारी यांच्यात मध्यस्थी करून खरेदी सुरळीत सुरू करून दिली.
-राधाकिसन पठाडे, सभापती बाजार समिती, संभाजीनगर
हा तर शेतकऱ्यांवर अन्याय
इतर कुठल्याही मार्केटमध्ये टोमॅटोचे भाव इतके कमी झालेले नाहीत. मात्र करमाड येथील व्यापाऱ्यांनी भाव कमी केले हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. बाजार समितीने याकडे लक्ष देऊन इतर मार्केट पेक्षा करमाडला कुठल्याही परिस्थितीत भाव कमी मिळू नये याची दक्षता घ्यावी, असे मत बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी आणलेले अरुण सुखदेव भोसले, नवनाथ बद्री हिवाळे, बाबासाहेब पोफळे, कल्याण कचकुरे, ज्ञानेश्वर इथर, कल्याण पोफळे आदी शेतकऱ्यांनी लोकमत कडे व्यक्त केले.