वेताळवाडी नदीतील थरार! पुरात अडकलेल्या १० भाविकांना ग्रामस्थांनी वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:16 IST2025-08-20T15:16:11+5:302025-08-20T15:16:57+5:30
सोयगाव तालुक्यातील रुद्रेश्वरजवळील वेताळवाडी नदीतील थरारक प्रसंग

वेताळवाडी नदीतील थरार! पुरात अडकलेल्या १० भाविकांना ग्रामस्थांनी वाचविले
सोयगाव : तालुक्यातील रुद्रेश्वर लेणी परिसरात आलेल्या सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील १० भाविक वेताळवाडी नदीच्या अचानक वाढलेल्या पुरात अडकले. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे या सर्वांचे प्राण वाचविण्यात यश आले. ही थरारक घटना सोमवारी दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास घडली.
सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील १० जण कारने (एमएच २०-एजी ७३२९) सोयगाव तालुक्यातील रुद्रेश्वर लेणी व गणेश मंदिर येथे श्रावण सोमवारानिमित्त दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर परतताना वेताळवाडी नदी पार करताना अचानक वाढलेल्या पुरात त्यांची कार अडकली. सुरुवातीला नदीतील प्रवाह कमी होता. मात्र, काही क्षणांतच पाणी झपाट्याने वाढले आणि कार नदीच्या मध्यभागी थांबून राहिली. ही घटना वेताळवाडी येथील ग्रामस्थ व पोलिस पाटील श्रीराम जाधव यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ इसाक शहा, आयूब शहा, आरीफ खान, माजित खान मेवाती, गुफरान पठाण, कालू हुसेन मेवाती यांच्यासह पोहण्याचा अनुभव असलेल्या दहा ते बारा तरुणांना घेऊन रेस्क्यू मोहीम सुरू केली. सर्वांनी धोकादायक पुराच्या पाण्यात उड्या टाकून कार पकडली आणि ती पाण्यातून ढकलत सुरक्षित किनाऱ्यावर आणली. त्यामधून तीन पुरुष, चार महिला व तीन लहान मुले सुखरूप बाहेर काढण्यात आली. यानंतर सत्तार खान मेवाती यांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही कार पाण्याबाहेर काढण्यात आली.
सुखरूप उडणगावला पाठविले
वेताळवाडी येथील ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून तीन पुरुष, चार महिला व तीन लहान मुलांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर शाबीर मिस्तरी यांच्या वाहनातून सुरक्षितपणे उंडणगाव येथे पाठविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. थोडासा विलंब झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.