छत्रपती संभाजीनगरात थरार; मित्राला शिवी दिल्याच्या रागातून तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:03 IST2025-06-20T14:01:25+5:302025-06-20T14:03:34+5:30
मांस कापायच्या सुऱ्याने तिघांवर सपासप वार; अन्य दोघे जखमी, हल्लेखोर मध्यरात्री जेरबंद

छत्रपती संभाजीनगरात थरार; मित्राला शिवी दिल्याच्या रागातून तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : शहरात किरकोळ कारणावरून गंभीर गुन्हे घडणे सुरूच आहे. मित्राला शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणातून चिकन शॉपवर काम करणाऱ्याने तीन तरुणांवर मांस कापायच्या सुऱ्याने सपासप वार केले. डोके, छातीत सुरा खुपसला गेल्याने नितीन सोनाजी संकपाळ (३५, रा. राजनगर, मुकुंदवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ व मित्र दत्ता बालाजी जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री ८ वाजता मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या पुढे चिकन शॉपसमोर ही घटना घडली.
नितीनचा सख्खा मोठा भाऊ असलेला सचिन काही दिवसांपूर्वी पुण्याहून शहरात आला होता. दोघांनी मुकुंदवाडी परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्याचे ठरवले. जेवण करून बाहेर आले असता तेथे त्यांची दत्तासोबत भेट झाली. तिघे गप्पा मारत असताना त्यांचे कुरेशीच्या दुकानात काम करणाऱ्या मस्तान कुरेशी उर्फ नन्ना (२५) याचा मित्र समीर शेख (रा. मिसारवाडी) सोबत वाद झाले. शेखने शिवीगाळ करत तिघांना धक्काबुक्की केली. नन्नाने अचानक वादात उडी घेत तिघांना शिवीगाळ करून खुनाची धमकी दिली. वाद वाढताच नन्नाने दुकानात जात सुरा आणून तिघांवरही हल्ला चढवला.
डोक्यातच पहिला वार
डोके, छातीच्या डाव्या बाजूत खोल वार केल्याने गंभीर जखमी होऊन नितीन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला. तरीही नन्नाने सचिन, दत्तावर वार सुरूच ठेवले. गर्दी जमा होताच नन्ना, समीरने धूम ठोकली. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक भारत पाचोळे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवी गच्चे, संदीप सोळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वाहनचालकांचा जखमींना घेण्यास नकार
स्थानिकांनी तिघांना रुग्णालयात नेण्यासाठी वाहनचालकांना थांबण्याची विनंती केली. मात्र, अनेकांनी नकार दिल्याने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाला. मिनी घाटीत नेईपर्यंत नितीनचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच नन्नाने साई टेकडी परिसरात नवीन घर घेतले होते. मोबाईल बंद करून तो कुटुंबाला भेटून पळण्याच्या तयारीत होता. मात्र, सहायक निरीक्षक भारत पाचोळे, अंमलदार संजय नंद, हैदर शेख, प्रकाश सोनवणे, परशुराम सोनवणे, संतोष गायकवाड यांनी तत्परतेने त्याला उचलले. नन्नावर यापूर्वी मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. समीरचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
विनाकारण वादात पडला
पोलिसांच्या माहितीनुसार, इलेक्ट्रिशियन असलेला समीर नन्नाचा मित्र आहे. वादापूर्वी तोही हॉटेलमध्ये होता. हॉटेलमागे लघुशंका करताना समीरचे तिघांपैकी एकासोबत वाद झाले. हॉटेलसमोर त्यांच्यात वाद उफाळून आल्यावर नन्ना विनाकारण वादात पडला.
सुस्वभावी, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर
नितीन, सचिनच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने आईनेच त्यांना वाढवले. नितीनची सिडको बसस्थानकाबाहेर अंडा आम्लेट, चहाची गाडी होती. मनमिळाऊ नितीन सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमी सक्रिय असल्याने नेते, पदाधिकाऱ्यांसाेबत त्याचे चांगले संबंध होते. त्याचा मोठा भाऊ सचिन पुण्याला लिफ्ट मेंटेनन्सचे काम करतो. नितीनला तीन तर सचिनला दोन अपत्ये आहेत.