चोरट्यांचा कहर; एकाच इमारतीमधील तीन घरांत चोरी; लाखोंच्या दागिन्यांसह रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:52 IST2025-11-24T19:52:37+5:302025-11-24T19:52:52+5:30
या तिन्ही चोरीच्या घटनांप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

चोरट्यांचा कहर; एकाच इमारतीमधील तीन घरांत चोरी; लाखोंच्या दागिन्यांसह रोकड लंपास
वाळूज महानगर : सिडको महानगर १ परिसरातील पुष्पक रेसिडेन्सीमधील इमारतीमध्ये चोरट्यांनी एकाच दिवशी तीन घरांचे कोंडे तोडून सोन्याचे दागिने व रोकड असा २ लाख २३ हजार ९८८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या रेसिडेन्सीमध्ये सलग तीन घरफोड्या झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांतही खळबळ उडाली. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ११:३० ते २ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी नारायण सुधाकर गडकर ( ३०, रा. फ्लॅट सी-८) हे दुपारच्या सुमारास हॉस्पिटलच्या कामानिमित्ताने बाहेर गेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कडी-कोयंडे तोडून आत घुसले. १ लाख ११ हजार ९४५ रुपयांचे सोन्याचे नेकलेस, अंगठी आणि पोत असा मुद्देमाल चोरून नेला. घरातील कपाटांची उचकापाचक करून सामान इतस्त: फेकून दिले.
त्याच मजल्यावरील सी-१२ मध्ये राहणारे बाळासाहेब कोंडीबा राऊत यांच्या घराचेही लॉक चोरट्यांनी तोडले. त्यांच्या घरातून ८२ हजार ४३ रुपये किमतीचे सोन्याचे झुंबर, बाळ्या, ओम पत्ता पेंडल, वेल अंगठ्या आणि मंगळसूत्र आदी दागिने चोरून नेले. राऊत यांनी चोरीच्या दागिन्यांची माहिती आणि पावत्या तक्रारीसोबत पोलिसांना दिल्या आहेत.
तिसरी घरफोडी सी-७ मध्ये राहणारे अमोल सखाराम गाडेकर यांच्या फ्लॅटमध्ये झाली. चोरट्यांनी घराचे कोंडे तोडून घरात ठेवलेली ३० हजार रुपये रोकड चोरली. तिन्ही घरांमध्ये भर दिवसा झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. एकाच रेसिडेन्सीतील तीन फ्लॅट निवडून चोरट्यांनी एवढ्या बेमालूमपणे घरफोडी केल्याने चोरट्यांना परिसराची पूर्ण माहिती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्याची भावना रहिवाशांत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे.
फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे की, अज्ञात इसमाने आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने घरफोडी केली असून या प्रकरणात कठोर कारवाई करावी. या तिन्ही चोरीच्या घटनांप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहे.