तीन संस्थांच्या संयुक्त बैठकीनंतरच ठरणार ‘सेव्हन हिल ते ॲम्बॅसॅडर हॉटेल’ रस्त्याची रुंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:20 IST2025-08-21T19:18:23+5:302025-08-21T19:20:32+5:30

मनपा, सिडको आणि एमआयडीसीची संयुक्त बैठक; मनपाच्या निवेदनावरून पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी

The width of the ‘Seven Hill to Ambassador Hotel’ road will be decided only after a joint meeting of the Municipal Corporation, CIDCO and MIDC. | तीन संस्थांच्या संयुक्त बैठकीनंतरच ठरणार ‘सेव्हन हिल ते ॲम्बॅसॅडर हॉटेल’ रस्त्याची रुंदी

तीन संस्थांच्या संयुक्त बैठकीनंतरच ठरणार ‘सेव्हन हिल ते ॲम्बॅसॅडर हॉटेल’ रस्त्याची रुंदी

छत्रपती संभाजीनगर : ‘सेव्हन हिल ते ॲम्बॅसॅडर हॉटेल’पर्यंतचा जालना रोड नेमका किती रुंदीचा हे निश्चित करण्यासाठी मनपा, सिडको आणि एमआयडीसीची संयुक्त बैठक होऊन त्याबाबत शपथपत्र सादर करण्यासाठी काही वेळ लागेल, असे निवेदन मनपातर्फे ॲड. सुहास उरगुंडे यांनी बुधवारी केले. त्यावर न्या. मनीष पितळे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी याचिकांची पुढील सुनावणी १८ सप्टेंबर २०२५ रोजी ठेवली आहे.

उपरोक्त रस्ता ३०, ४५ आणि ६० मीटर रुंद असल्याचा दावा विविध प्राधिकरणे करत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला असल्याने वरील तिन्ही संस्थांची संयुक्त बैठक घेऊन व शासनाचा सल्ला घेऊन रस्त्याचा ‘हा भाग’ नेमका किती रुंदीचा आहे, याचा निश्चित निष्कर्ष काढल्यानंतर शपथपत्र दाखल करू, असे विधान मनपातर्फे ॲड. संभाजी टोपे यांनी यापूर्वीच्या सुनावणीवेळी (दि. १५ जुलै) केले होते. पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्त्यांच्या मालमत्तांवर कारवाई करणार नाही, अशी हमी मनपाने दिली होती.

यांच्या याचिकांवर होती सुनावणी
मे. अबोली ॲडव्हायजर्स (इन्फिनिटी इन्फ्रा बिझनेस सेंटर), मे. एम. डब्ल्यू. मिश्रीकोटकर (अरिहंत मोटर्स), मेघदूत रिसॉर्टस् (अतिथी हॉटेल) आणि जितेंद्र जैन (ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स) यांच्याकडे बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रे असून, प्रारूप विकास आराखड्यामध्ये त्यांच्या मालमत्ता रस्ता रुंदीकरणाने बाधित होत नव्हत्या. शासनाला सादर केलेल्या आराखड्यामध्ये रस्त्याची आखणी बदललेली दिसते. शासनस्तरावर रस्त्याच्या आखणीत बदल करावयाचा असेल तर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या कलम ३१ प्रमाणे सूचना व हरकती मागवणे आवश्यक असताना अशी कोणतीही कार्यवाही न झाल्याने शासनाने सर्व रस्त्याची बदललेली आखणी मंजूर केली, असे म्हणता येणार नाही. या तांत्रिक चुकीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करेपर्यंत याचिकाकर्त्यांच्या मालमत्तांसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यास मनपाला मनाई करावी, अशी विनंती ॲड. देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत तर रामगिरी हॉटेल्सतर्फे ॲड. डी. जे चौधरी यांच्यामार्फत केली आहे.

Web Title: The width of the ‘Seven Hill to Ambassador Hotel’ road will be decided only after a joint meeting of the Municipal Corporation, CIDCO and MIDC.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.