लेकीच्या शिक्षणासाठी लालपरी येते बांधावर; जान्हवीच्या पत्राने परिवहनमंत्र्यांचे मन जिंकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:45 IST2025-12-15T16:40:55+5:302025-12-15T16:45:01+5:30
शेताच्या बांधावर थांबली लालपरी! जान्हवीच्या जिद्दीने शिक्षणाची वाट मोकळी केली

लेकीच्या शिक्षणासाठी लालपरी येते बांधावर; जान्हवीच्या पत्राने परिवहनमंत्र्यांचे मन जिंकले!
- यादवकुमार शिंदे
सोयगाव : छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्यातील निंभोरा येथील एका हुशार व जिद्दी विद्यार्थिनीच्या प्रयत्नांमुळे लालपरी अर्थात एसटी बसने आता तिच्या शिक्षणाची वाट सुकर केली आहे. महाविद्यालयात जाणाऱ्या जान्हवी सोपान महाजन या विद्यार्थिनीसाठी आता एसटी बस थेट तिच्या शेताच्या बांधावर दररोज सकाळी ९ वाजता थांबते.
जान्हवी पाचोरा येथील मुरलीधर मानसिंगा कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी कला या वर्गात शिक्षण घेते. शेताजवळच बसथांबा देण्याची विनंती केली मान्य शेतातील आखाड्यावर कुटुंबीयांसह राहणाऱ्या जान्हवीला बस पकडण्यासाठी दूरवरील बसस्थानकावर जावे लागत होते. अनेकदा बस चुकल्याने तिच्या शिक्षणात अडथळे येत होते. त्यामुळे तिने थेट परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवून शेताजवळ बसथांबा देण्याची विनंती केली.
एसटी सकाळी ९ वाजता, सायंकाळी ५ वाजता थांबते
मंत्री सरनाईक यांनी पत्र वाचून जान्हवीसाठी शेताच्या बांधावर एसटी बस थांबविण्याचे आदेश दिले. जळगावचे विभाग नियंत्रक दिलीप बंजारा आणि पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी तत्काळ कारवाई केली. त्यांनी जान्हवीशी संवाद साधून कुटुंबीयांची शेतावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर जान्हवीसाठी लालपरी थेट तिच्या शेतीच्या बांधावर सकाळी ९ वाजता थांबेल व सायंकाळी ५ वाजता आणून सोडेल, अशी गोड बातमी दिली.