रस्ता खड्डेमय, रेल्वे धावते मनमाडमार्गे, छत्रपती संभाजीनगरहून पुणे विमानसेवेच्या फक्त गप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:00 IST2025-11-11T15:59:14+5:302025-11-11T16:00:02+5:30
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त शहरातून पुण्याला ये-जा करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे.

रस्ता खड्डेमय, रेल्वे धावते मनमाडमार्गे, छत्रपती संभाजीनगरहून पुणे विमानसेवेच्या फक्त गप्पा!
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्रातील दुसऱ्या सर्वांत मोठ्या महानगराशी म्हणजे पुण्याशी थेट जोडण्याकरता विमानसेवा सुरु होण्याची वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत आहे. सध्या पुण्याचा रस्ता खड्डेमय झाला आहे तर नांदेड-पुणे एक्स्प्रेस मनमाडमार्गे धावते. परिणामी, रस्ते, रेल्वेने पुणे गाठण्यासाठी ७ ते ८ तास लागतात. त्यामुळे शहरातून पुण्यासाठी विमानसेवा कधी सुरू होणार, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त शहरातून पुण्याला ये-जा करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. एसटी बस, ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांचा अधिक ओढा आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. परिणामी, प्रवासासाठी ७ ते ८ तास लागत आहेत. नांदेड- पुणे एक्स्प्रेसलाही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. परंतु रेल्वेने प्रवास करण्यासाठी साडेआठ तास लागतात. या स्थितीत पुण्यासाठी विमानसेवा कधी सुरू होणार, त्याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
फक्त घोषणा अन् चर्चाच
२०२२ मध्ये फ्लायबिग एअर लाइन्सने शहरातून पुण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु त्यास प्रत्यक्षात मुहूर्त मिळालाच नाही. फेब्रुवारी २०२२ मध्येच महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने एका बैठकीत पुणे - छत्रपती संभाजीनगर- नागपूर विमानसेवा सुरू होईल, असे सांगितले होते. परंतु या घोषणा, चर्चा फक्त कागदावरच राहिल्या.
पाठपुरावा सुरू
पुण्याला रस्ते मार्गाने जाण्यासाठी खूप वेळ जात आहे. एअर इंडिया, इंडिगो यांच्यासह फ्लाय-९१, स्टार एअर यांच्याकडे विमानसेवेची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सकाळी आणि सायंकाळी या दोन्ही वेळेत पुण्यासाठी विमानसेवा शक्य आहे. सकाळी पुण्याला जाऊन सायंकाळी विमानाने परत येता येईल.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हील एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’