अतिरिक्त वाळूज एमआयडीसीसाठीच्या आरापूर जमिनीचा दर दिवाळीनंतर ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:08 IST2025-10-14T18:08:28+5:302025-10-14T18:08:50+5:30
दिवाळीनंतर शेतकऱ्यांसोबत वाटाघाटीसाठी बैठक होणार

अतिरिक्त वाळूज एमआयडीसीसाठीच्या आरापूर जमिनीचा दर दिवाळीनंतर ठरणार
छत्रपती संभाजीनगर : शासनाने वाळूजपासून जवळच असलेल्या आरापूर येथे नवीन औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरापूरसह तीन गावांतील जमीन एमआयडीसी प्रशासन संपादीत करणार आहे. या जमिनीचा दर ठरवून ती संपादीत करावी लागणार आहे. जमिनीचा दर ठरविण्यासाठी एमआयडीसी दिवाळीनंतर शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एकही भूखंड शिल्लक नाही. परिणामी मागणी करूनही उद्योजकांना तेथे भूखंड मिळत नाहीत. परिणामी शेकडो उद्योजकांनी खासगी जमिनीवरील भूखंड विकत घेऊन तेथे उद्योग थाटले आहेत. अजूनही भूखंडाची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग विभागाने अतिरिक्त वाळूज या नावाने आरापूर एमआयडीसी विकसित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ७६२ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. यात ९.६० हेक्टर सरकारी, तर उर्वरित ७५२.४३ हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे. शासनाने दोन महिन्यांपूर्वी आरापूर एमआयडीसीची अधिसूचना जारी केली.
शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी
या जमिनीचे संपादन करण्यापूर्वी जमिनीचे दर ठरवा आणि मोबदला द्या, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी प्रशासनाने उद्या मंगळवारी आरापूर येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, आता दिवाळी सण तोंडावर आल्याने उद्याची बैठक रद्द करण्यात आली आहे. दिवाळीनंतर ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहतील. जमिनीच्या दरासंदर्भात थेट शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करण्यात येणार आहेत. वाटाघाटीमध्ये शेतकरी काय दर मागतात आणि शासन किती दर देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वाळूज एमआयडीसीची स्थिती
स्थापना- १९८३
संपादीत जमीन - १५१३.२८ हेक्टर.
भूखंड वाटप- ३६१०