ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा उघडा दरवाजा धावत्या रिक्षात घुसला, दोन मैत्रिणींचा गळा कापल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:57 IST2025-11-20T18:56:53+5:302025-11-20T18:57:39+5:30

पत्रा अडकल्याचे कळूनही बेजबाबदार चालक थांबला नाही, रिक्षाला फरफटत नेत पलटेपर्यंत बस चालवत राहिला

The open door of a travel van crashed into a running rickshaw, killing two friends by slitting their throats. | ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा उघडा दरवाजा धावत्या रिक्षात घुसला, दोन मैत्रिणींचा गळा कापल्याने मृत्यू

ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा उघडा दरवाजा धावत्या रिक्षात घुसला, दोन मैत्रिणींचा गळा कापल्याने मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : मध्यप्रदेशमधील सिहाेरच्या कुबेरेश्वर धाम येथे दर्शन करुन शहरात परतलेल्या दहा प्रवाशांच्या रिक्षाचा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा लगेज कंपार्टमेंटचा (डिक्की) दरवाजा उघडा राहिला. दरवाजा थेट रिक्षात घुसला. यात मागे बसलेल्या चौघींपैकी लता राजू परदेशी (४७), आशा राजू चव्हाण (४०, दोघी रा. वाळूज) या दोन मैत्रिणींचा जागीच मृत्यू झाला. दोघी गंभीर जखमी झाल्या. चालकासह त्याच्या मागील सीटवर बसलेल्या तिघींच्या वरून डिक्कीचा दरवाजा गेल्याने ते बालंबाल वाचले. बुधवारी पहाटे ४ वाजता पंचवटी चौक ते लोखंडी पूल रस्त्यावर ही घटना घडली.

मध्यप्रदेशात सिहोर येथे कुबेरेश्वर धाम असून, पंडित प्रदीप मिश्रा त्याचे प्रमुख आहेत. देशभरातून तेथे हजारो भाविक रोज दर्शनासाठी जातात. वाळूज परिसरातील आशा, लता यांच्यासह त्यांच्या मैत्रिणीही धार्मिक होत्या. दोन महिन्यांपासून त्यांनी सिहोर येथे जाण्याचे ठरवले होते. लता, आशा यांच्यासह मंगल अरुण व्हाणे, भारती भगवान एकनुरे, सीमा शिवाजी काकडे, अनिता सुधाकर मोतकर, शांता सीताराम बलैया, शोभा सुभाष वाघ व अन्य दोघे असे एकूण दहा जण १७ नोव्हेंबर रोजी रेल्वेने सिहाेर येथे दर्शनासाठी गेले होते. त्यांच्यातील दोघे तेथेच मुक्कामी थांबले. तर आठ जण भोपाळ, मनमाड मार्गे रेल्वेने पहाटे ३ वाजता शहरात परतले. त्यांच्यापैकी शामा श्रीरामपूरला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवरच थांबल्या. तर सात मैत्रिणींनी रिक्षा करुन वाळूजला जाण्याचे ठरवले.

अर्धा तास महिला मृतावस्थेत पडून
-लता, आशा, भारती व मंगल या रिक्षाच्या मागील सीटवर बसल्या. तर उर्वरित तिघी मधल्या सीटवर बसल्या. आरटीओ कार्यालयासमोरून रिक्षाने पंचवटी चौकातून लोखंडी पुलाच्या दिशेने वळण घेतले.
-त्याच वेळी पर्पल कंपनीची ट्रॅव्हल्स (एमपी ०९ एके ८०१६) सुसाट समोरून येत होती. बसच्या उजव्या बाजूच्या डिक्कीचा दरवाजा क्लीनरने उघडा ठेवल्याने जवळपास तीन फुट तो बाहेर आला होता.
-पहाटे अंधार असल्याने चालकाला ही बाब दिसलीच नाही. लक्षात येईपर्यंत बस वेगात येत डिक्कीचा दरवाजा थेट रिक्षात घुसला. मागे बसलेल्या लता, आशा यांच्यापर्यंत तो जात त्यांना गंभीर जखमी केले.
-डिक्कीचा दरवाजा रिक्षात घुसल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र, तरीही त्याने बस पुढे नेल्याने रिक्षा फरफटत जात पलटी झाली. या भीषण अपघातात लता, आशा यांचा जागीच मृत्यू झाला. तर भारती व मंगल या जखमी झाल्या. सीमा, अनिता व शांता बचावल्याने सुखरूप घरी परतल्या.

अपघाताचा मोठा आवाज, चालक, क्लीनर ताब्यात
रिक्षाचालकाने स्वत:ला सावरत इतरांना मदत मागितली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने आसपासचे स्थानिक, अन्य वाहनचालकांनी धाव घेतली. त्यांनी ११२ वर घटना कळवली. त्यानंतर छावणी पोलिसांनी धाव घेतली. जखमी महिलांना त्यांच्या नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पळून जाणारे बसचालक चेन्नवरी श्रीकांत गुवे (२९, रा. बिदर, कर्नाटक) व क्लीनर राज सुनील बैरागी (२०, रा. मध्यप्रदेश) यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांवरही लता यांचे भाऊ बाळू दुसारे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात असून, गुवे, बैरागीला अटक करण्यात आल्याचे छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांनी सांगितले.

Web Title : खुले ट्रक दरवाजे से ऑटो रिक्शा दुर्घटना में दो महिलाओं की मौत

Web Summary : छत्रपति संभाजीनगर के पास एक ट्रक के खुले डिब्बे के दरवाजे से ऑटो रिक्शा टकराने से दो महिलाओं की मौत हो गई, दो घायल हो गईं। पीड़ित तीर्थयात्रा से लौट रहे थे। पुलिस ने ट्रक ड्राइवर और क्लीनर को गिरफ्तार कर लिया।

Web Title : Open truck door kills two women in autorickshaw accident.

Web Summary : Two women died, two injured near Chhatrapati Sambhajinagar after a truck's open compartment door struck their autorickshaw. The victims were returning from a pilgrimage. Police arrested the truck driver and cleaner.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.