‘गोल्ड मार्केट’मध्ये गुंतवणुकीचे आमिष, ८ लाखांसह दीड तोळ्यांच्या अंगठ्या घेऊन भाडेकरू पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:52 IST2025-11-26T19:52:07+5:302025-11-26T19:52:32+5:30
रुग्णालयात कार्यरत क्लार्कची फसणूक : जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

‘गोल्ड मार्केट’मध्ये गुंतवणुकीचे आमिष, ८ लाखांसह दीड तोळ्यांच्या अंगठ्या घेऊन भाडेकरू पसार
छत्रपती संभाजीनगर : ‘गोल्ड मार्केट’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३९ वर्षीय प्रवीण शहाणे (रा. संजयनगर) यांची त्यांच्याकडे काही वर्षांपूर्वी राहिलेल्या भाडेकरूनेच ८ लाखांचा गंडा घालत दीड तोळ्याच्या अंगठ्या घेऊन पसार झाला. संतोष पुंडलिक बुंदे (४०, रा. चिकलठाणा) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहाणे एमजीएम रुग्णालयात लिपिक आहेत. २००२ ते २००७ दरम्यान आरोपी बुंदे त्यांच्या घरी भाड्याने राहत असल्याने त्यांची चांगली ओळख होती. तेव्हा बुंदे आरसी बाफना येथे नोकरीला होता. ऑक्टोबर, २०२४ मध्ये त्याने शहाणे यांना आर.सी. बाफना ज्वेलर्समार्फत सोन्यात गुंतवणुकीच्या स्किमविषयी सांगितले. ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ४०० रुपये प्रतिदिवस परतावा देण्याचे आमिष दाखवले. हे सर्व पैसे इंटर्नल गोल्ड मार्केटमध्ये गुंतवणार असल्याचेही सांगितले. बुंदेने त्यांची रुग्णालयात जात भेट घेत पैसे गुंतवण्यास सांगितले. मात्र, शहाणे यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने विश्वासात घेत त्यांच्या दीड तोळ्यांच्या अंगठ्या घेत अंगठ्यांवरच तुमचा रोजचा नफा सुरू होईल, असे सांगितले.
६५ हजार रुपये देऊन विश्वास जिंकला
शहाणे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत ऑक्टोबर, २०२४ ते नोव्हेंबर, २०२४ दरम्यान ८८ हजार ६०० रुपये दिले. त्या बदल्यात आरोपी बुंदनेने त्यांना ६५ हजार रुपये पाठवले. यामुळे शहाणे यांचा विश्वास अधिक वाढला. त्यानंतर त्यांनी त्याला ७ लाख ६३ हजार रुपये दिले. त्याच्या काही दिवसांतच बुंदेचा मोबाइल स्विच ऑफ झाला. शहाणे यांनी त्याचे घर गाठले तेव्हा तो कुटुंबासह घर सोडून पसार झाल्याचे समोर आले. त्यानंतर शहाणे यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक नामदेव सुरडकर अधिक तपास करत आहेत.