हुंडा घेतला, विम्याचे ८० लाख आल्यानंतर छळ आणखी वाढला; विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:41 IST2026-01-14T13:38:24+5:302026-01-14T13:41:28+5:30
हुंडा, विम्याच्या पैशांवर डोळा; सततचा मानसिक-शारीरिक छळ अखेर जिवावर बेतला

हुंडा घेतला, विम्याचे ८० लाख आल्यानंतर छळ आणखी वाढला; विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले
वाळूज महानगर : हुंडा आणि विम्याच्या लाखो रुपयांच्या रकमेवर डोळा ठेवत पती व सासरच्या नातेवाइकांनी वारंवार पैशांची मागणी करून मानसिक व शारीरिक छळ केल्याने एका गरोदर विवाहितेने आत्महत्या केली.
फिर्यादी गोदावरी परमेश्वर घोपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी पल्लवी हिचा पहिला विवाह २०१५ साली झाला होता. तिला सहा वर्षाची मुलगी आहे. पहिल्या पतीचा २०२१ मध्ये अपघातात मृत्यू झाला.
कुटुंबीयांनी तिचा दुसरा विवाह १२ जुलै २०२४ रोजी गोपाल सहाने (रा. स्वस्तिक सिटी, वडगाव कोल्हाटी) याच्याशी करून दिला. लग्नात तीन लाख रुपये रोख व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात आली. सप्टेंबर २०२४ मध्ये पहिल्या पतीच्या अपघाती मृत्यूचा विम्याचे ८० लाख रु. पल्लवीला मिळाल्याचे समजताच दुसरा पती गोपालने पैशांची मागणी सुरू केली. पल्लवीच्या खात्यातून ३० ते ३५ लाख रुपये काढण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
इतर नातलगांचाही लोभीपणा
सासरकडील इतर नातेवाइकांनीही पैशांसाठी छळ वाढवला. नणंद सीमाच्या लग्नासाठी २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. नकार दिल्यानंतर पल्लवीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला १० लाख रुपये देण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर नणंद अर्चना जाधव व तिचा पती किशोर जाधव यांच्या घरबांधणीसाठी पुन्हा २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या दोघांनी छळ करून पल्लवीकडून ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे. पती गोपाल सहाने, नणंद कविता चिकटे, नणंद अर्चना जाधव, नंदई किशोर जाधव आणि दीर समाधान चिकटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.