हे सरकार खोटारडे! मदतीच्या नावाने संकटातील शेतकऱ्यांसोबत थट्टा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:31 IST2025-11-05T11:27:25+5:302025-11-05T11:31:42+5:30
'न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत!' उद्धव ठाकरेंची शेतकऱ्यांना भावनिक साद, तर राज्य सरकारला दिले थेट आव्हान

हे सरकार खोटारडे! मदतीच्या नावाने संकटातील शेतकऱ्यांसोबत थट्टा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात इतिहासात कधी नव्हे इतकी भीषण नैसर्गिक आपत्ती आलेली असताना, राज्य सरकार केवळ 'अभ्यास' करण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे आणि जूनमध्ये नाही तर तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पैठण तालुक्यातील नांदर येथे शेतकर्यांशी संवाद साधताना केली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आजपासून 'दगाबाज रे' शेतकरी संवाद दौरा सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी सकाळी नांदर येथे ठाकरे यांनी अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. "शेतकरी हा भोळाभाबडा आहे, पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका. मराठवाड्यात मोठी आपत्ती आली असताना राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. दिवाळीपूर्वी मदत देऊ म्हणाले, पण मदतीच्या नावावर आळस करत आहेत," असे ते म्हणाले.
कर्जमुक्ती ही थट्टा नाही
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारला त्यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा अनुभव सांगितला. "मी कसलीही मागणी नसताना कर्जमुक्ती केली होती. आता कर्जमुक्ती केली तर बँकांना फायदा होईल असे म्हणत आहेत. मग जूनमध्ये बँकांना फायदा होणार नाही याची माहिती द्यावी," असा सवाल ठाकरे यांनी केला.
५० हजार हेक्टरी मदत द्या
नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. पीक विमा कंपन्या दोन-तीन रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. एका शेतकऱ्याला तर केवळ ८९ रुपये मिळाले. तर दुसरीकडे विदेशी समिती स्वदेशी शेतकऱ्यांची वाट लावणार आहे, असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार
"शेतकरी हताश झाला आहे, त्याला आता मदत केली नाही तर तो संकटात जाईल. हे खोटे बोलणारे सरकार आहे. न्याय मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे," अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. शेवटी, त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करताना सांगितले, "शेतकरी म्हणून एकत्र आलो तरच न्याय मिळणार आहे. शेतकरी जमिनीतून कोंब फोडू शकतो, तर राज्य सरकारला नक्कीच फोडणार."