पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले; रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:18 IST2022-07-02T12:17:56+5:302022-07-02T12:18:58+5:30
गणेश परमेश्वर गायकवाड आणि अनिल भगवानराव आम्ले हे दोघे पोलीस भरतीची तयारी करत.

पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले; रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले
वसमत (हिंगोली): पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना आज पहाटे पाच वाजेच्य दरम्यान कवठा कुरुंदा मार्गावरील कालव्याजवळ घडली. गणेश परमेश्वर गायकवाड ( २४, रा. पोर्णिमा नगर), अनिल भगवानराव आम्ले (१८, रा. शामनगर कवठा रोड) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
गणेश परमेश्वर गायकवाड आणि अनिल भगवानराव आम्ले हे दोघे पोलीस भरतीची तयारी करत. शारिरिक चाचणीसाठी दोघेही रोज पहाटे सराव करत. आज पहाटे नेहमीप्रमाणे गणेश आणि अनिल धावण्याचा सराव करण्यासाठी घराबाहेर पडले. दरम्यान, वसमत-कवठा-कुरुंदा मार्गावरील छोट्या कालव्याजवळ अज्ञात वाहनाने दोघांनाही चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक विलास चवळी, फौजदार संदिप यामावार, अजय पंडित, अविनाश राठोड यांनी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रक्रीया सुरु आहे. पोलीस युवकांना चिरडून फरार झालेल्या वाहनाचा शोध घेत आहेत.