कर्जाचा भार सोसेना; शेतकरी वडिलांनंतर २५ वर्षीय मुलानेही त्याच ठिकाणी संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:50 IST2025-07-03T12:50:33+5:302025-07-03T12:50:44+5:30
सोयगाव तालुक्यातील घटना; आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर, त्यातच खरीप हंगामावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत उचलले टोकाचे पाऊल

कर्जाचा भार सोसेना; शेतकरी वडिलांनंतर २५ वर्षीय मुलानेही त्याच ठिकाणी संपवलं जीवन
सोयगाव : पाच महिन्यांपूर्वीच वडिलांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्यानंतर याच कर्जाचा भार सोसत नसल्याने एका २५ वर्षीय तरूण शेतकऱ्याने सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. मयूर रामलाल राठोड असे मयताचे नाव आहे.
निंबायती येथील रामलाल राठोड यांच्यावर खासगी बँकेचे ३ लाख रुपयांचे कर्ज होते. शेतीतून फारसे उत्पन्न होत नसल्याने त्यांनी कर्जास कंटाळून पाच महिन्यांपुर्वी घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर राठोड यांच्या कुटुंबाची जबाबदार त्यांचा २५ वर्षीय मुलगा मयुरवर आली. आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर, त्यातच खरीप हंगामावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत मयुर गेल्या काही दिवसांपासून होता. मयूरसाठी हा ताण असह्य झाल्याने त्याने बुधवारी वडिलांनी गळफास घेतलेल्या घरातच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मयूरला सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर गुरुवारी सकाळी दहा वाजता जरंडी येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी, काका असा परिवार आहे. जरंडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमृत राठोड यांचा तो पुतण्या होत.