जमीन व्यावसायिकावर गोळीबार करून हल्लेखोर शेतातील जनावरांच्या गोठ्यात लपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:19 IST2025-10-03T19:19:13+5:302025-10-03T19:19:40+5:30
सिडको एमआयडीसी गोळीबार प्रकरण : पाचही आरोपींना अटक

जमीन व्यावसायिकावर गोळीबार करून हल्लेखोर शेतातील जनावरांच्या गोठ्यात लपले
छत्रपती संभाजीनगर : बारच्या पार्किंगमध्ये कारसमोर लघुशंका करण्यावरून झालेल्या वादात जमीन व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत गोळीबार करून पसार झालेल्या योगराज केशव बमणे (२१), सचिन लक्ष्मण परदेशी (२६) व सचिन पंढरीनाथ दुधे (२६, तिघे रा. धनगरगल्ली, हर्सूल) यांना अटक केल्याचे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.
कमळापूरचे जमीन व्यावसायिक तौफिक शौफिक पठाण हे दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री मित्रासह चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील पाम हॉटेल अँड बारमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर रात्री ते बाहेर पडले. त्याचदरम्यान गणेश जनार्दन औताडे (२४) व धीरज संतोष थोरात (२५, दोघे रा. हर्सूल) व पठाण यांच्यात वाद झाले. त्यातून हॉटेलबाहेर औताडेने तौफिक यांच्या कारसमोर लघुशंका केली. त्यातून वाद उफाळून येत दोघांमध्ये हाणामारी झाली. यामुळे गणेश व धीरजने हर्सूलमधील मित्रांना बोलावून घेतले. त्याच्या २० मिनिटांत काही अंतरावर ताैफिक यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ज्यात गोळी निसार यांच्या कानाच्या बाजूने जात दोघे बालंबाल बचावले होते.
चौकशीत मित्रांबाबत कबुली
हल्ल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांनी चार दिवसांपूर्वी गणेश व धिरजला अटक केली. त्यांच्या चौकशीत बारबाहेर वाद झाल्यानंतर त्यांनी सिडको परिसरातच दारू पित बसलेल्या बमणे, परदेशी व दुधेला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनीच तौफिक यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली.
जनावरांच्या शेतात लपून बसले
निरीक्षक कल्याणकर यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक भरत पाचोळे, अंमलदार संतोश सोनवणे, संजय नंद, प्रकाश सोनवणे, बाबूराव पांढरे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, अरविंद पुरी यांनी तिघांचा शोध सुरू केला. तिघेही सावंगी परिसरातील एका मठा मागील शेतात जनावरांच्या गोठ्यात मोबाइल बंद करून लपल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पथकाने धाव घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. शेतात खड्डा करून त्यांनी बंदूक लपवून ठेवली होती. यातील परदेशीवर २०२१ मध्ये एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा, तर दुधेवर २०२३ मध्ये फुलंब्री पाेलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल आहे.